Samvidhan Divas
Samvidhan Divas
Savidhan Din
जा.क्र. राशैसंप्रपम /सा.शा./सं.दि./२०२५-२६/
दि. १०/११/२०२५
विषयः २६ नोव्हेंबर "संविधान दिन" साजरा करणेबाबत..
संदर्भ: १. महाराष्ट्र शासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन सामंजस्य करार दि. २८ एप्रिल, २०२५
उपरोक्त संदर्भिय विषयानुसार, दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस २०१५ पासून संविधान दिन (संविधान दिवस) म्हणून साजरा केला जातो, जो भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान सभेच्या मसुदा समितीच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची दखल घेण्यासाठी साजरा केला जातो. दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत केले व दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्त्व अनेक स्तरांवर असून भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते.
संविधान दिवस मराठी माहिती वाचा या ओळीला स्पर्श करून
भारताचे संविधान हे आपल्या लोकशाही व्यवस्थेचे मूळ स्तंभ असून त्यामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मानवमूल्ये अंतर्भूत आहेत. संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो, कारण या दिवशी भारतीय संविधान स्वीकारण्यात आले होते. या दिवसाचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यातील मूल्यांचे दैनंदिन जीवनात आचरण करणे आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका ओळखणे.+
२६ नोव्हेंबर संविधान दिन प्रश्न मंजुषा सोडवा या ओळीला स्पर्श करून
विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये रुजविण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनसोबत मिळून-मूल्यवर्धन कार्यक्रम राज्यभरात राबविण्यासाठी सामंजस्य करार केला असून पुढील ५ वर्षांमध्ये राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांमध्ये मूल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यात येणार आहे. मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून शाळांमध्ये जो मूल्याधारित शिक्षणाचा प्रयत्न केला जातो, त्याला संविधान दिनाच्या उपक्रमांद्वारे अधिक बळकटी मिळते. या दिवशी घेण्यात येणारे उपक्रम विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे आत्मसात आणि आचरण करण्याची प्रत्यक्ष संधी देतात, ज्यामुळे मूल्यवर्धनाची प्रक्रिया अधिक परिणामकारक ठरते.
तदनुषंगाने २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त शाळांनी पुढील कार्यक्रम / उपक्रम मूल्यवर्धनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून राबवावेत, ज्यात संवैधानिक मूल्य रुजविण्याचा दृष्टिकोन अंगीकारणे
महत्त्वाचे आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नागरिकत्व, जबाबदारी, सहकार्य, सामाजिक संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये दृढ होतील. अशा प्रकारे संविधान दिन हा फक्त औपचारिक न राहता मूल्याधिष्ठित शिक्षणाचा अनुभव देणारा दिवस ठरेल.
हर घर संविधान कार्यक्रम वाचा या ओळीला स्पर्श करून
१) उपक्रमाचे नाव:- संविधान दिन प्रभात फेरी
उद्दिष्टेः-
१) विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल आदर आणि जागरूकता निर्माण करणे.
२) नागरिक म्हणून कर्तव्यभावना विकसित करणे.
३) समाजात संविधानाचे महत्त्व पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
विद्यार्थ्यांनी संविधानातील घोषवाक्यांसह फलक तयार करावेत.
शाळेपासून गाव किंवा परिसरात प्रभात फेरी काढावी.
फेरीदरम्यान घोषवाक्ये, देशभक्तीपर गीते सादर करावीत.
२) उपक्रमाचे नाव:- संविधान व्याख्यानमाला / सेमिनार
उद्दिष्टेः
१) विद्यार्थ्यांना संविधान निर्मितीची प्रक्रिया समजावून देणे.
२) संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची ओळख करून देणे.
३) विद्यार्थ्यांना संविधानाच्या अभ्यासासाठी प्रेरित करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
संविधान अभ्यासक, प्राध्यापक किंवा वकील यांचे व्याख्यान आयोजित करावे.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नोत्तर सत्राची व्यवस्था करावी.
व्याख्यानानंतर थोडक्यात चर्चासत्र घ्यावे.
३) उपक्रमाचे नाव:- संविधानविषयक चित्रकला व पोस्टर स्पर्धा
उद्दिष्टेः
१) विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणे.
२) संविधानाच्या मूल्यांबद्दल कलात्मक पद्धतीने जनजागृती करणे.
३) दृश्यकलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
स्पर्धेचे विषय ठरवावेत (उदा. "आपले संविधान - आपला अभिमान").
आवश्यक साहित्याची व्यवस्था करावी.
निवडक चित्रे प्रदर्शनासाठी शाळेत लावावीत.
४) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा (Quiz Competition)
उद्दिष्टे:
१) विद्यार्थ्यांचे संविधान विषयक ज्ञान वाढवणे.
२) गटाने कार्य करण्याची सवय लावणे.
३) स्पर्धात्मकतेतून शिकण्याची वृत्ती निर्माण करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणीः-
संविधानाशी संबंधित प्रश्नसंच तयार करणे.
गट किंवा वर्गनिहाय स्पर्धा घेणे.
विजेत्या गटांना प्रमाणपत्र व बक्षीस देणे.
५) उपक्रमाचे नावः संविधान विषयक पथनाट्य
उद्दिष्टेः- १) समाजात संविधानिक मूल्यांची जनजागृती करणे.
२) विद्यार्थ्यांमध्ये नाट्याद्वारे अभिव्यक्ती कौशल्य विकसित करणे.
३) सामाजिक समरसतेचा संदेश देणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
विद्यार्थ्यांना पथनाट्य सादर करण्यासाठी अभिनयाचे प्रशिक्षण द्यावे व सराव करवून घ्यावा.
शाळा, ग्रामपंचायत, सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करावे.
नाटकामधून संविधान दिनाचा संदेश द्यावा.
६) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित पोवाडा / गाणी सादरीकरण
उद्दिष्टेः
१) लोककलेच्या माध्यमातून संविधानाबद्दल अभिमान निर्माण करणे.
२) ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक अभिव्यक्ती विकसित करणे.
३) राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणीः
विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित पोवाडे, गाणी शिकवणे.
शाळेच्या कार्यक्रमात सादरीकरण करणे.
सर्वोत्तम सादरीकरणास पारितोषिक देणे.
७) उपक्रमाचे नावः मानवी साखळी निर्मिती
उद्दिष्टेः-
१) संविधानातील "एकता व अखंडता" या मूल्यांचा अनुभव देणे.
२) विद्यार्थ्यांमध्ये सामुहिक कार्यासाठी आवश्यक समन्वय वाढवणे.
३) सामाजिक ऐक्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
शाळा प्रांगणात किंवा सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांनी हातात हात घालून साखळी तयार करावी.
"आम्ही भारताचे लोक" या घोषवाक्याने कार्यक्रमाची सुरुवात करावी.
साखळीदरम्यान संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करावे.
८) उपक्रमाचे नावः सेल्फी पॉईंट "I love Constitution":-
उद्दिष्टेः
- १) विद्यार्थ्यांना आधुनिक माध्यमातून संविधानाशी जोडणे.
२) सकारात्मक प्रचाराद्वारे संविधान दिन लोकप्रिय करणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
शाळेत "संविधान दिन सेल्फी पॉईंट" तयार करावा.
विद्यार्थ्यांनी संविधानाचे प्रतीक, भारतीय ध्वजासह छायाचित्रे घ्यावीत.
"माझा देश-माझा अभिमान" सारखे घोषवाक्य वापरावे.
९) उपक्रमाचे नावः संविधानावर आधारित हस्तकला स्पर्धा:-
उद्दिष्टेः
- १) विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्याला वाव देणे.
२) संविधानातील प्रतिके, चिन्हे यांची ओळख करून देणे.
३) सृजनशील माध्यमातून देशभक्ती जोपासणे.
उपक्रमाची तयारी व अंमलबजावणी:-
विद्यार्थ्यांना संविधानाशी संबंधित मॉडेल्स तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे.
तयार केलेल्या प्रतीकांचे प्रदर्शन शाळेत भरवावे.
उपरोक्त प्रमाणे शाळास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती यांच्या उपस्थितीत करावे. सदरउपक्रमाच्या अंमलबजावणीतून शासनाचे धोरण व संवैधानिक मूल्यांचे जतन आणि संवर्धन होईल याची काळजी घ्यावी. कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन (SMF) मार्फत जिल्हा कार्यक्रम समन्वयक व तालुका समन्वयक आपणांस आवश्यक ते सहकार्य करतील.
सदर कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांनी शिक्षण संचालक (प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक), पुणे यांना दि. ३० नोव्हेंबर, २०२५ पर्यंत सादर करण्यात यावा.
परिपत्रक पीडीएफ लिंक
संचालक
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रति,
१. विभागीय शिक्षण उपसंचालक, (सर्व)
२. उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (सर्व)
३. प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (सर्व)
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक / माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)
५. शिक्षण निरीक्षक, (पश्चिम, दक्षिण, उत्तर), मुंबई.
६. प्रशासन अधिकारी, म.न.पा./ न.पा. (सर्व)

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon