DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Mokshagundam Visvesvaraya

Mokshagundam Visvesvaraya

मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

      

🌸मोक्षगुंडम विश्वेश्वरैया🌸

भारतीय अभियंता 

जन्म - सप्टेंबर १५, १८६०

मृत्यू - १४ एप्रिल १९६२ 

प्रसिद्ध स्थापत्य अभियंते. जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात चिक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहळ्ळी येथे. त्यांचे पूर्वज आंध्र प्रदेशातील कुर्नूल भागातील मोक्षगुंडम यागावचे.  त्यांच्या वडिलांचे नाव पंडित श्रीनिवासशास्त्री व आईचे व्यंकचम्मा. वडील संस्कृतचे गाढे विद्वान होते.  

विश्वेश्वरय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर या खेड्यात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण बंगलोरच्या सेंट्रल कॉलेजामध्ये झाले. १८८० मध्ये ते बी. ए. परीक्षा विशेष गुणवत्तेत उत्तीर्ण झाले. म्हैसूर सरकारने पुढील शिक्षणासाठी त्यांना शिष्यवृत्ती दिली. १८८३ मध्ये ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. या परीक्षेत ते मुंबई प्रांतात पहिले आले.

स्थापत्यशास्त्रातील त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला. १८८४ मध्ये मुंबई सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची साहाय्यक अभियंता पदावर नियुक्ती झाली. नासिक जिल्ह्यात त्यांची प्रथम नियुक्ती झाली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे त्यांना मौलिक मार्गदर्शन लाभले. पुणे व गुजरातमधील सुरत जिल्ह्यात त्यांनी काम केले. १९०४ साली शासनाने आरोग्य अभियंता या पदावर त्यांना बढती दिली.

आपल्या साठी तयार करण्यात आलेल्या समुहात सामील व्हा 

खडकवासला येथील जुन्या दगडी बांधकामाच्या धरणात त्यांनी संशोधन करून तयार केलेली स्वयंचलित शीर्षद्वारे पहिल्यांदा बसविण्यात आली होती. त्यांच्यामुळे त्यांनी पाण्याचा अपव्यय टाळला. १९०६ साली एडनला लष्करी वसाहतीसाठी त्यांची साहाय्यक बंदर अधिकारी म्हणून नेमणूक झाली. त्यापूर्वी त्यांनी मुंबई सरकारच्या सचिवालयात सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत पाटबंधारे विभागात विशेष अधिकारी म्हणून काम केले. पुण्याच्या डेक्कन क्लबच्या स्थापनेत त्यांनी भाग घेतला. १९०७ साली मुंबई सरकारच्या नोकरीतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. 

    १९०९ साली हैदराबाद संस्थानात विशेष सल्लागार अभियंता म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. हैदराबाद शहराची पुनर्रचना, मूसा व इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून शहराचे संरक्षण ही कामे त्यांनी केली. याच वर्षी म्हैसूर संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या विनंतीनुसार त्यांनी म्हैसूर संस्थानच्या प्रमुख अभियंता पदाची सूत्रे हाती घेतली. १९१२ ते १९१८ ही सहा वर्षे म्हैसूर संस्थानचे दिवाण म्हणून शिक्षण, उद्योग,कृषी आदी सर्व क्षेत्रांत त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. म्हैसूर आर्थिक परिषदेला स्थायी रूप देऊन अनेक विकासकामे हाती घेतली. उदा., म्हैसूर बँक, म्हैसूर विद्यापीठ, प्राथमिक शिक्षणाचा विस्तार, मुलींचे पहिले वसतिगृह व शेतकी महाविद्यालय, वृंदावन गार्डन यांची उभारणी, कन्नड साहित्य अकादमी, आर्थिक लेखा परीक्षणाबरोबरच कार्यक्षमता लेखा परीक्षण वगैरे. रेशीम उत्पादन, चंदन तेल, साबण, धातू व क्रोम टॅनिंग, सिमेंट, साखर कारखाने, लघू उद्योग, हॉटेल व उपाहारगृहे, विश्रामधाम, मुद्रणालये, क्लब यांच्या निर्मिती उद्योगास त्यांनी चालना दिली. 

    म्हैसूरसाठी भाटकलला बंदराची सोय केली. आपल्या प्रयत्‍नांनी रेल्वेचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या कक्षेत आणले. काही ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग उभारले. सेवाभरती शर्ती, मागासवर्गीयांसाठी राखीव जागा आदी समाजोन्मुख कार्ये त्यांनी केली. १९२६ साली त्यांनी म्हैसूर संस्थानच्या सेवेचा स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर त्यांचा भद्रावती आयर्न अँड स्टील वर्क्स, श्री जय चामराजेंद्र ऑक्युपेशनल इन्स्टिट्यूट वगैरे संस्थांशी घनिष्ट संबंध आला. मुंबईची प्रिमियर ऑटोमोबाइल इंडस्ट्री स्थापण्यातही त्यांनी विशेष प्रयत्‍न केले. हिंदुस्थान एअरक्राफ्ट फॅक्टरी (सध्याची दि हिंदुस्थान एरॉनॉटिक्‌स) व ग्रामीण औद्योगिक प्रकल्पांच्या योजनेतही त्यांनी भाग घेतला.

    विश्वेश्वरय्या यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या. धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी ते दात्रटीपर्यंत वक्रनलिकेने पाणीपुरवठा ही योजना साकार करून त्यांनी धुळे शहर पाणीपुरवठा योजना व सुरत शहर पाणीपुरवठा योजनाही साकार केली. सक्कर शहराच्या पाणीपुरवठ्याचा बिकट प्रश्न त्यांनी सक्कर बंधाऱ्यांची उभारणी करून सोडविला. शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या व कमीत कमी पाण्यात अनेक तऱ्हेच्या पिकांना पाणी देण्याची गट पद्धती त्यांनीच सुरू केली. ओरिसा राज्यातील महापूराच्या नियंत्रणाचे निर्मातेही तेच. म्हैसूरपासून १८ किमी. वरील कृष्णराजसागर हे प्रचंड धरण स्वातंत्र्यपूर्व काळातच त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली बांधले गेले. सु. ४० मीटर उंचीला लागणारा पाया लक्षात घेऊन कामाला सुरुवात केली. आज या धरणामुळे सु. ८ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येते. १२.५ कोटी रुपयांची कावेरी बंधारा योजना त्यांनीच पूर्ण केली. 

जाणून घ्या अभियंता दिना बद्दल या ओळीला स्पर्श करून 

    यांखेरीज कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड व विजापूर शहर पाणीपुरवठा योजना त्यांनीच कार्यान्वित केल्या. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

विश्वेश्वरय्या यांनी अनेक संस्थांवर व समित्यांवर केलेले कार्य मौलिक स्वरूपाचे आहे. मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष (१९२१-२२), भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष (१९२५), मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष, मुंबई बॅक बे चौकशी समितीचे अध्यक्ष, नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार, भद्रावती पोलाद कारखान्याचे चेअरमन; अध्यक्ष, अखिल भारतीय उत्पादक संस्था (१९४१); संचालक, जमशेटपूर टाटा लोखंड व पोलाद कारखाना, मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र, मुंबई प्रांत आरोग्य समितीचे सदस्य, मुंबई विद्यापीठाच्या रासायनिक उद्योग उन्नती समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. मुंबई, कराची, बडोदा, सांगली, मोरवी, भोपाळ, पंढरपूर, अहमदनगर, नागपूर, भावनगर,राजकोट, गोवा या नगरपालिकांना त्यांनी आर्थिक अडचणीत मार्गदर्शन केले.

विश्वेश्वरय्या यांनी पाच वेळा अमेरिकेचे दौरे केले. खेरीज जपान, इटली, इंग्‍लंड, स्वीडन, रशिया, कॅनडा, सिलोन (श्रीलंका), जर्मनी व फ्रान्स या देशांना विविध निमित्तांनी भेटी दिल्या.

शिस्त हा त्यांच्या परवलीचा शब्द होता. ते सतत कठोर परिश्रम करीत. प्रत्येक काम नियमित, नीटनेटके व स्वच्छ असावे हा त्यांचा आग्रह असे.

भारताच्या प्रगतीसाठी आपल्या भाषणांतून व लेखनांतून ते तळमळीने विचार मांडीत. भारताच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय संरक्षणातील धोके, राष्ट्रीय चारित्र्य, राष्ट्रबांधणी व राष्ट्रीय कार्यक्षमता या विषयांवर त्यांनी व्यक्त केलेले विचार मार्गदर्शक होतील. आपल्या विषयातील त्यांचे ज्ञान अत्यंत अचूक होते. एकदा रेल्वेतून प्रवास करीत असताना रेल्वेच्या बदललेल्या आवाजावरून त्यांनी १.५ किमी. वरील रेल्वे रूळ उखडले आहेत असे अचूक अनुमान काढून हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले होते.

रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया (१९२०), प्‍लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया (१९३४), प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेम्वॉयर्स ऑफ माय वर्किंग लाइफ (१९६०) ही त्यांची पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.

नवभारताचे एक निर्माते म्हणून विश्वेश्वरय्या यांच्या विविधोपयोगी कार्याचा व त्यांच्या ज्ञानाचा अनेक संस्थांनी, विद्यापीठांनी व शासनांनी गौरव केला. लोकांमध्ये ते एम्. व्ही. या नावाने परिचित होते.

ब्रिटिश सरकारने त्यांना सर हा किताब दिला. मुंबई, कलकत्ता, काशी, पाटणा, अलाहाबाद व म्हैसूर या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. देऊन गौरवले. १९५५ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्‍न’ देऊन गौरवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ पोस्टाचे तिकीट काढले. विश्वेश्वरय्यांनी अनेक संस्थांना लाखो रूपयांच्या देणग्या दिल्या. देशातील अनेक संस्थांना विश्वेश्वरय्या यांचे नाव कृतज्ञतेने देण्यात आले आहे. सर विश्वेश्वरय्या यांची स्मृती म्हणून कर्नाटक सरकारने बंगलोर येथे ‘सर विश्वेश्वरय्या सायन्स म्युझियम’ उभारले आहे. हे म्युझियम भारतातील सर्वांत मोठे सायन्स म्युझियम आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मदिनी अभियांत्रिकी क्षेत्रातील मान्यवरांस प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जातो. त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ म्हणून भारतभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फेही १९९८ पासून त्यांचा जन्मदिन ‘अभियंता दिन’ (Engineers Day) म्हणून साजरा करण्याचे घोषित झाले. गुणवत्ता संवर्धन व सचोटीला प्रोत्साहन मिळावे म्हणून भारतरत्‍न सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र शासनाने १९९७ पासून ‘उत्कृष्ट अभियंता पुरस्कार’ देण्यास सुरुवात केली आहे.

विश्वेश्वरय्यांनी आपल्या जन्मगावी सुंदर घर बांधले असून १९७१ मध्ये त्याचा राष्ट्रीय स्मारकात समावेश केला गेला आहे. या घरातील वस्तुसंग्रहालयात विश्वेश्वरय्या यांच्या नित्य वापरातील काही वस्तू, त्यांना मिळालेल्या भेटवस्तू व भारतरत्‍न गौरवपदक ठेवण्यात आले आहे. गावातील विशाल बागेत त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला आहे. बंगलोर येथे या शतायुषी महापुरुषाचे निधन झाले. 

साभार - इंटर नेट 

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon