DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Khajgi Shala Shikshak Bharti Nivad Prakriya


मुलाखतीसह पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक ०७/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवडप्रक्रिया पूर्ण करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय,
महाराष्ट्र राज्य, मध्यवती इमारत,पुणे

जा.क्र.आस्था-क/प्राथ १०६/ मुलाखतीसह पदभरती/२०२४/४८८७

दि. ०८/०८/२०२४

प्रति,
अध्यक्ष/सचिव, संबंधित शैक्षणिक संस्था ('मुलाखतीसह' पद भरतीचा विकल्प दिलेल्या सर्व संस्था)

विषय :- 'मुलाखतीसह' पदभरतीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत दिनांक ०७/०८/२०२४ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवडप्रक्रिया पूर्ण करण्याबाबत.

संदर्भ : १. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक सिईटी-२०१५/ प्रक्र १४९/टीएनटी-१ दिनांक ०७/०२/२०१९.

२. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१८/प्रक्र३११/टीएनटी१ दिनांक १/०१/२०१९.
३. शासन निर्णय क्र संकीर्ण-२०२२/प्रक्र १०६/ टीएनटी१ दिनांक १०/११/२०२२
४. शासन निर्णय क्र संकीर्ण-२०२३/प्रक्र१७४/टीएनटी-१ दि.२१/०६/२०२३
५. शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८/प्रक्र ३९७/ टीएनटी-१ दि.०७/०२/२०१९, शुद्धिपत्रक दिनांक २५/०२/२०१९, दि.१६/०५/२०१९
 ६ .दि.१२/०६/२०१९.शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्रक्र ५०९/ टीएनटी-१ दि.१३/१०/२०२३
७ . पवित्र पोर्टलवर मुखपृष्ठावरील उमेदवारांसाठी/व्यवस्थापनासाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना
८. शासन पत्र क्र संकीर्ण-२०२४/प्रक्र ४९४/टीएनटी-१ दि.०६/०८/२०२४
९. मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथील याचिका क्रमांक २५३४/२०२४ व संलग्न याचिकेतील आदेश दिनांक ०७/०३/२०२४ व २५/०७/२०२४

    राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या / खाजगी शैक्षणिक संस्थांच्या अनुदानित अंशतः अनुदानित विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील रात्र शाळांतील तसेच शासकीय व अनुदानित अध्यापक वि‌द्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२२ चे आयोजन दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ या कालावधीत करण्यात आले होते. सदर चाचणी परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी दिनांक १२/०२/२०२३ अखेर अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती.

    सदर चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे पवित्र पोर्टलवर दिनांक ३०/०९/२०२३ स्व-प्रमाणपत्र तयार करण्यात आले. संच मान्यता सन २०२२-२३ नुसार मंजूर पदांच्या आधारे राज्यातील बिंदू नामावलीची
तपासणी करण्यात आली. शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय दिनांक २१/०६/२०२३ मधील तरतुदीनुसार रिक्त पदांच्या ८०% पदे भरण्यास परवानगी आहे. दिनांक १६/१०/२०२३ ते २२/०१/२०२४ या कालावधीमध्ये शैक्षणिक संस्थांना पोर्टलवर जाहिरात देण्याची सुविधा देण्यात आलेली होती. त्यानुसार आपल्या शैक्षणिक संस्थेने शिक्षण सेवक/शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पोर्टलवर जाहिरात दिली आहे.👇


    सदर जाहिरातीच्या अनुषंगाने शिक्षण सेवक/शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी, संस्थेची जाहिरात. त्यातील आरक्षण (समांतर आरक्षणासह) अध्यापनाचा गट, विषय, शिकविण्याचे माध्यम उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम व उमेदवाराचे शिक्षक अभियोग्यता व बु‌द्धिमता चाचणी- २०२२ मधील प्राप्त गुण या सर्वांचा एकत्रित विचार करून सर्वसाधारण गुणवता यादी तयार करण्यात आलेली आहे.

    मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी १:१० या मर्यादेत (सामाजिक व समांतर आरक्षणासह उपलब्धतेनुसार) उमेदवार उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

    शासन निर्णय दिनांक ०७/०२/२०१९ मध्ये नमूद केल्यानुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण ३० गुण आहेत. यासाठी शासन पत्र दिनांक ०६/०८/२०२४ अन्वये निवड प्रक्रियेतील पारदर्शकता व एकसूत्रीपणा राहण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) निश्चित केली आहे. सदर मार्गदर्शक कार्यपद्धतीचा अवलंब करून शिक्षक पदभरतीची कार्यवाही करावी, जेणेकरून शिक्षक पदभरती पारदर्शी व निपक्षपातीपणे पार पडेल. उमेदवाराची अंतिम निवड सदर ३० गुणांच्या आधारे गुणानुक्रमे आरक्षण व विषय विचारात घेऊन होईल.

    पवित्र पोर्टलवर वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचना, शैक्षणिक संस्थांसाठी मार्गदर्शक सूचना, व स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) या सर्वांचे पालन करून शिक्षक पदभरतीची कालमर्यादेत कार्यवाही करावी.

सोबत :
1. मार्गदर्शक सूचना
2. शासन पत्र दिनांक 06/08/2024


(सूरज मांढरे, भा.प्र.से.)

आयुक्त (शिक्षण) 
महाराष्ट्र राज्य, पुणे-१

प्रत माहितीस्तव सविनय सादर
मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी :
१. शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, शिक्षण संचालनालय, पुणे
२. शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय,, पुणे
३. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व विभाग
४. शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) सर्व जिल्हा परिषदा

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विस्तार इमारत, मंत्रालय, 
मुंबई

क्रमांक:- संकीर्ण-२०२४/प्र.क्र.४९४/टिएनटि-१

दिनांक : ०६ ऑगस्ट, २०२४.

प्रति,
आयुक्त (शिक्षण),
महाराष्ट्र राज्य, पुणे.

विषय :- शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी मधील गुणवत्तेच्या आधारे करावयाच्या मुलाखतीसह या प्रकरातील शिक्षक निवडीसाठी विहीत मुलाखत व अध्यापन कौश्यल्यावर आधारित ३० गुणांची घटकनिहाय विगतवारी करण्याबाबत.

संदर्भ :-
१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.३०२ /टिएनटी-१, दि.०६.०७.२०२३
२) शासन पूरक पत्र, सामान्य प्रशासन विभाग, क्र. प्रानिमं-१२१७/(प्र.क्र.९२/१७) /१३-अ, दि.०२.१२.२०१७
३) आपले पत्र क्र. आस्था-क/प्राथ १०६/पवित्र-पदभरती/मानककार्यपध्दती/२०२४/३४५९, दि.२७.०५.२०२४

महोदय,
    उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भ क्र. ०३ येथील आपल्या पत्रास अनुसरुन शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी नुसार करावयाच्या मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय स्विकारलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता संदर्भ क्र. ०१ येथील शासन निर्णयान्वये विहीत मानक कार्यपध्दतीमध्ये मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित ३० गुणांची घटकनिहाय विगतवारी संदर्भात मानक कार्यपध्दती (Standard Operating Procedure) विहीत करण्यात आली असून सोबत जोडण्यात आली आहे. त्यानुसार मुलाखतीसह याप्रकारातील शिक्षक पदभरतीमध्ये अधिक पारदर्शकता येण्याकरिता व भरती प्रक्रियाबाबतची विश्वासार्हता वाढण्याच्या दृष्टीने सोबतच्या विहीत मानक कार्यपध्दतीप्रमाणे (Standard Operating Procedure) मुलाखतीसह याप्रकरातील शिक्षक पदभरतीची पुढील आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्यात यावी.

कक्ष अधिकारी, 
महाराष्ट्र शासन

खाजगी संस्थांतील पात्र उमेदवारांची मुलाखतीसह या प्रकाराकरीता शिक्षक पदासाठी निवड करताना (Standard Operating Procedure) खालीलप्रमाणे ठरविण्यात येत आहे:-

१) शासन निर्णय क्र.संकीर्ण २०२३/प्र.क्र.३०२/टीएनटी-१, दि.०६.०७.२०२३ मधील मुद्दा क्र. (आ) नुसार मुलाखतीकरीता देण्यात येणाऱ्या ३० गुणांची विभागणी पुढीलप्रमाणे करण्यात यावी.

अ) उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व (एकूण गुण ५) -
(i) पदाविषयीची कर्तव्यनिष्ठा -
(ii) पर्यावरणाची जाणीव -
(iii) सामाजिक भान, इत्यादी

ब) उमेदवारांचे सामान्यज्ञान (एकूण गुण ५) --

(i) चालू घडामोडी
(ii) महाराष्ट्राचा भूगोल / इतिहास
(ii) राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय समस्या, इत्यादी

क) उमेदवारांचे विषयज्ञान (एकूण गुण १०)

(i) शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान -
(ii) शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान-
iii) शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता (Applicationability) ज्ञान-

ड) उमेदवाराचे पाठनिरीक्षण (एकूण गुण १०) --

(i) पाठाची पूर्वतयारी -
(विषयानुरूप नियोजन, वेळेचे नियोजन इत्यादी.)
(ii) पाठादरम्यान विषयाची मांडणी -
(अनुरूप प्रस्तावना, विविध विषयाची सांगड, मुख्य विषयाकडे प्रवेश) (iii) पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर -
(गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापर, शैक्षणिक तंत्रज्ञान वापर, फलक लेखन इत्यादी)
(iv) पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग / प्रतिसाद- (वर्ग नियंत्रण, चैतन्यमय वातावरण, विद्यार्थी सहभाग इ.)
(v) पाठाचे यशस्वी पुनरावलोकन (Review) (शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्टनिहाय मूल्यमापन, अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी.)

२. गुणदान प्रक्रीयेचा अवलंब केल्यानंतर उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास, यामध्ये ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांची निवड करताना पुढील प्राधान्यक्रम विचारात घेण्यात यावेः-
१. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील.
२. समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनु क्र.१ नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुणप्राप्तअसतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे.
३. वरील अनु क्र. १ व २ या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (इ.१२ वी/पदवी/पदव्युत्तर पदवी, डीएड/बीएड/समकक्ष) यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावेत.
३. निवड प्रक्रियेत वस्तुनिष्ठता व पारदर्शकता येण्याकरीता निवड प्रक्रियेतील सर्व टप्प्यांवरील मुलाखत व अध्यापन कौशल्याची तपासणी करणे यासाठी सदर कक्ष/वर्गखोलीमध्ये सदर प्रक्रियेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करुन जतन करुन ठेवण्यात यावेत.
४. निवड प्रक्रियेचे सर्व अभिलेख तयार करुन त्यांचे जतन करुन ठेवण्यात यावेत.

दिनांक 08/08/2024
पवित्र पोर्टल मार्फत खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील 'मुलाखतीसह' शिक्षक पदभरतीसाठी मार्गदर्शक सूचना (व्यवस्थापन व मुलाखतीसाठी निवडपात्र उमेदवारांसाठी )

अ) सर्वसाधारण सूचना

1) शिक्षण सेवक / शिक्षक पदभरतीसाठी जाहिरात दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी निवडप्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने पोर्टलवर देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
2) 'मुलाखतीशिवाय' शिक्षक पदभरती या प्रकारातील दिनांक 25/02/2024, 25/06/2024 व दि.30/07/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या नियुक्ती प्राधिकारी यांच्यासाठीच्या सूचनांचे देखील अवलोकन करावे.
3) पवित्र पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्याबाबत उमेदवारांसाठी सूचना यामध्ये दिनांक 1/09/2023, 05/02/2024 रोजी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्याचेदेखील अवलोकन करावे.
4) पवित्र पोर्टलवर शैक्षणिक संस्था व उमेदवार यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व सूचनांचे अवलोकन करून आवश्यक ती कार्यवाही करावी.
5) शिक्षक/शिक्षण सेवक पदभरतीसाठी माहे ऑक्टोबर, 2023 ते जानेवारी, 2024 या कालावधीमध्ये व्यवस्थापनामार्फत बिंदू नामावली व रिक्त पदांच्या माहितीची नोंद करून पवित्र पोर्टलवर व वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत.
6) पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. 'मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय दिलेल्या शैक्षणिक संस्थांना उमेदवारांचे मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी दिनांक 07/08/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
7) उमेदवारास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 मध्ये प्राप्त गुण, पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, तसेच विविध न्याय निवाडे- आदेश, शासन निर्णय इत्यादी सर्व बाबींना एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या यांसाठी शिफारस झाली आहे.
8) सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील शिफारसपात्र उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठीची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांकडून 09/08/2024 ते 31/08/2024 या कालावधीत करण्यात येईल.
9) नियुक्ती प्राधिकारी म्हणून ज्या शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर जाहिरात दिलेली होती, परंतु विविध कारणास्तव ।। शैक्षणिक संस्थांच्या एकूण 43 पदांसाठी उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केली जाणार नाही. अशा शैक्षणिक संस्थातील सदर कमी होत असलेल्या रिक्त पदांची माहिती पोर्टलवर प्रसिद्धीस देण्यात येत आहे.
10) शैक्षणिक संस्थांना Website Link या संकेतस्थळावर लॉगिन करण्यासाठी संस्थेचा सरल पोर्टलवरील संस्था Code हा User ID असेल व जो यापूर्वी password सेट केला असेल तो वापरून लॉगिन करता येईल. पासवर्ड विसरला असल्यास, होम पेजवरील Forgot password या मेनूवर क्लिक करून योग्य ती माहिती नोंद केल्यानंतर, नोंदणीकृत (Registered) मोबाईलवर आलेल्या ओटीपीचा वापर करून नवीन पासवर्ड Reset करता येईल.
11) शैक्षणिक संस्थेने पवित्र पोर्टलवर दर्शविलेल्या संकेतस्थळावर लॉगिन केल्यानंतर Reports या मेनूअंतर्गत General Merit List दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर General Merit List/Postwise and Subjectwise Merit List/ Categorywise Merit List या कोणत्याही मेनूवर क्लिक केल्यानंतर संस्थेने दिलेल्या जाहिरातीनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यांसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची यादी दिसेल. General Merit List या मेनूवर क्लिक केल्यानंतर संस्थेकडे शिफारस झालेल्या गुणवत्तेनुसार सर्व उमेदवारांची यादी उपलब्ध होईल.
12) व्यवस्थापनांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे स्व- प्रमाणपत्र (Self Certified copy) लॉगिन केल्यानंतर View Applicant Self Certified Copy यावर क्लिक करून संबंधित उमेदवारांचा परीक्षा क्रमांक नोंद करून submit यावर क्लिक केल्यानंतर उमेदवारांचे स्व-प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.
13) उमेदवाराची जास्तीतजास्त 10 प्राधान्यक्रमांवर गुणवत्तेनुसार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे.
14) मा. उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयांच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
15) प्रत्येक रिक्त जागेकरिता उमेदवारांच्या उपलब्धतेनु‌सार 1:10 या गुणोत्तराप्रमाणे (समांतर आरक्षणासह) मुलाखत व अध्यापन कौशल्या‌द्वारे निवडीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची यादी करण्यात आलेली आहे. सदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
16) पवित्र पोर्टलवर उमेदवारांकडून अपलोड केलेली कागदपत्रे (उदा., शैक्षणिक व व्यावसायिक प्रमाणपत्रे, जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, समांतर आरक्षण विषयक प्रमाणपत्रे इत्यादी) अपलोड करून घेण्यात आलेली आहेत. परंतु यापैकी कोणत्याही कागदपत्रांची/प्रमाणपत्रांची पडताळणी यास्तरावर करण्यात आलेली नाही. सदरची कागदपत्रे आपल्या लॉगिनवर डाऊनलोड करून घेण्यासाठी उपलब्ध आहेत. सदर कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून उमेदवार शिफारस केलेल्या पदासाठी पात्र असल्याची खात्री करावी. उमेदवाराने स्व-प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारेच मुलाखत व अध्यापन कौशल्या‌द्वारे निवडीसाठी शिफारस झालेली आहे. स्व- प्रमाणपत्रांमध्ये नोंद केलेली माहिती व प्रत्यक्षात उमेदवाराकडे असलेल्या कागदपत्रांमध्ये विसंगती असल्यास उमेदवार निवडीसाठी अपात्र ठरेल. व्यवस्थापनास उपलब्ध करून देण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्तायादी अंतिम निवडयादी नसून मुलाखतीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची यादी आहे. व्यवस्थापनाकडून मुलाखतीनंतर प्रसिद्ध होणारी यादी अंतिम निवडयादी असेल.
17) उमेदवाराच्या निवडीपूर्वी स्व-प्रमाणपत्रांमध्ये नमूद केलेली व उमेदवाराची ज्या पदासाठी निवड झाली आहे त्या पदासाठी आवश्यक असलेल्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी महाराष्ट्र खाजगी शाळा सेवाशर्ती नियमावली 1981 तसेच शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्रमांक सीईटी- 2015/प्रक्र 149/टीएनटी-1 दिनांक 07/02/2019 मधील मुद्दा क्रमांक 10 व अन्य तरतुदीनुसार गठीत केलेल्या 'शाळा समिती मार्फत करावी.
18) मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची स्व-प्रमाणपत्रे व उमेदवारांनी अपलोड केलेली कागदपत्रे व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
19) संस्थेने लॉगिन केल्यानंतर Reports या मेनूअंतर्गत उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेला उमेदवाराचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी यांची एकत्रित माहिती Recommended  
Candidates Communication Details यावर क्लिक केल्यानंतर उपलब्ध होईल. या माहितीचा वापर करून उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी संपर्क साधावा.
20) पात्र उमेदवारांचा गट, विषय व प्रवर्ग इत्यादींमध्ये व्यवस्थापनाच्यास्तरावर बदल करता येणार नाही. तथापि, मुलाखतीसाठी यादी तयार करताना आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातील पदासाठी पात्र ठरत असल्यास, अशा उमेदवारांना त्यांच्या मूळ प्रवर्गाऐवजी खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार विचारात घेण्यात आलेले आहे. अध्यापन कौशल्यानंतर निवडीच्या वेळी सदर उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी गुणानु‌क्रमे पात्र ठरत नसल्यास अशा उमेदवारांचा त्यांच्या मूळ प्रवर्गातदेखील (जाहिरातीमध्ये मूळ प्रवर्गाच्या जागा असल्यास) गुणवतेनुसार निवडीसाठी विचार करावा.
21) पोर्टलवर उमेदवारांनी नोंद केलेल्या माहितीनुसार मुलाखतीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची यादी व्यवस्थापनाच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यामध्ये उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, विषयनिहाय गुणवत्ता यादी, आरक्षणनिहाय गुणवत्ता यादी या या‌द्यांचा समावेश असेल. उमेदवाराची निवड करताना सर्वसाधारण गुणवत्तायादी नुसारच कार्यवाही करावी केवळ व्यवस्थापनाच्या माहितीसाठी विषय व आरक्षणनिहाय स्वतंत्र यादी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
22) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक सीईटी 2015/ प्रक्र-159/टीएनटी-1, दिनांक 07/02/2019 अन्वये उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील.
23) सदर 30 गुणदानाबाबतचे स्टैंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (SOP) याबाबतचे दिनांक 06/08/2024 रोजीचे शासन पत्र यासोबत देण्यात येत आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी याचा वापर करावा व त्यामध्ये दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
24) मुलाखत व अध्यापन कौशल्य या‌द्वारे संबंधित व्यवस्थापन उमेदवारांचे गुणपत्रक व निकाल पोर्टलवर जाहीर करेल. त्याप्रमाणे मुलाखतीस उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतरचा अंतिम निकालदेखील व्यक्तिशः कळविण्याची जबाबदारी संबंधित व्यवस्थापनाची राहील.
25) 'पवित्र पोर्टल' मार्फत शिक्षक पदभरतीसाठी शासनाच्या सर्व तरतुदींसह सामाजिक व समांतर आरक्षणाच्या तरतुदीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अपात्र उमेदवारास नियुक्ती दिली गेल्याचे निदर्शनास आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शैक्षणिक संस्थेची राहील.
26) मुलाखत व अध्यापन कौशल्यावर आधारित ग्णांन्सार नियुक्तीसाठी निवड केलेली आहे. अशा उमेदवारांची नियुक्ती सात कार्यालयीन दिवसात संबंधित व्यवस्थापन करेल. संबंधित व्यवस्थापन उमेदवारांचे नियुक्ती आदेश ई-मेल द्वारे संबंधित उमेदवार, संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक/ माध्यमिक), संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवेल. तसेच सर्व संबंधित उमेदवारांना नियुक्ती आदेशाची मूळ प्रत नोंदणीकृत (Registered R.P.A.D.) पोस्ट द्वारे पाठवेल. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांचा Selected व उर्वरित उमेदवारांचा Wait listed/Absent/Rejected (लागू असेल त्याप्रमाणे) या प्रकारामध्ये अंतिम निर्णय व्यवस्थापनाच्या लॉगिनला नोंद करून अंतिम निवडयादी प्रसिद्ध करावी लागेल.
27) कोणत्याही व्यवस्थापनाला पदभरतीसाठी उमेदवारांकडून कोणतेही अर्ज शुल्क / फी इत्यादी आकारता येणार नाही. 
28) निवडप्रक्रियेदरम्यान शैक्षणिक संस्थांना अडचणी असल्यास त्यांनी जाहिरात मान्य केलेल्या संबंधित शिक्षणाधिकारी / विभागाशी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक या कार्यालयाशी संपर्क साधावा.
29) शैक्षणिक संस्थांना तांत्रिक अडचणी असल्यास 📧 eMail Link या ईमेलवर संपर्क साधता येईल.
30) या पदभरतीच्या संपूर्ण प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
31) मुलाखत व अध्यापन कौशल्य यांसाठी कार्यवाही पूर्ण करण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना हार्दिक शुभेच्छा.

ब) मुलाखतीस उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता :-

1. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता दिनांक 12/02/2023 पूर्वी धारण करणे आवश्यक आहे. (CTET ही परीक्षा December, 2022 या बॅचमध्ये देऊन मार्च 2023 मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पात्र आहेत.)
2. उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता संदर्भातील शालेय शिक्षण विभागाचे शासन निर्णय दिनांक 7/2/2019, 25/02/2019, 16/05/2019, 12/06/2019 मध्ये नमूद केल्यानुसार असावी. तथापि, खाजगी शैक्षणिक संस्थातील उच्च माध्यमिक स्तरावरील (11 वी ते 12 वी) पदासाठी उमेदवार पदव्युत्तर पदवी किमान ‌द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच माध्यमिक स्तरावरील (9 वी ते 10 वी) पदासाठी उमेदवार पदवी स्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
3. इयत्ता 1 ली ते 5 वी, इयत्ता 6 वी ते 8 वी यासाठी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2018/ प्रक्र 397/ टीएनटी-1 दिनांक 07/02/2019 दिनांक 25/02/2019,16/05/2019, 12/06/2019 च्या शु‌द्धिपत्रकामध्ये व दिनांक 23/08/2013 नमूद केल्यानुसार राहील. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता खालील प्रमाणे -

1) इयत्ता 1 ली ते 5 वी -

शैक्षणिक अर्हता- इयत्ता 12 वी (उच्च माध्यमिक शालांत) परीक्षा अथवा समकक्ष 45% गुणासह (आरक्षित प्रवर्गासाठी 40% गुणासह) व व्यावसायिक अर्हता- D.Ed/D.El.Ed/D.T.Ed/TCH आणि TET-Paper-1 or CTET-Paper-1 उत्तीर्ण (खुला प्रवर्ग किमान 60 टक्के व आरक्षित प्रवर्ग- 55 टक्के गुण, दिव्यांग प्रवर्ग -55%, माजी सैनिक प्रवर्ग-45 टक्के गुण)

2) इयत्ता 6 वी ते 8 वी -

शैक्षणिक अर्हता- संबंधित विषय गटातील पदवी परीक्षा किमान 45% गुणासह (आरक्षित प्रवर्गासाठी 40% गुणासह) व

व्यावसायिक अर्हता- D.Ed/D.El.Ed/D.T.Ed/TCH OR B.Ed/B.A.Ed/B.Sc.Ed आणि TET-Paper-2 or CTET-Paper-2 संबंधित विषय गटात (भाषा विषयासाठी कोणत्याही विषय गटातील ) उत्तीर्ण (खुला प्रवर्ग- किमान 60 टक्के व आरक्षित प्रवर्ग- 55 टक्के गुण, दिव्यांग प्रवर्ग -55%, माजी सैनिक प्रवर्ग-45 टक्के गुण)

माध्यम- शालांत परीक्षा / उच्च माध्यमिक परीक्षा/ पदवी / व्यावसायिक अर्हता, ज्या ज्या माध्यमातून शिक्षण घेतले असेल त्या त्या माध्यमासाठी उमेदवार पात्र राहील.

3. इयत्ता 9 वी ते 10 वी -

शैक्षणिक अर्हता- संबंधित विषय गटातील पदवी

व्यावसायिक अर्हता- B.Ed/B.A.Ed/B.Sc.Ed/B.P.Ed. (For Physical Education Subject only) माध्यम-शालांत परीक्षा/ उच्च माध्यमिक परीक्षा/ पदवी/ व्यावसायिक अर्हता, ज्या ज्या माध्यमातून शिक्षण घेतले असेल त्या त्या माध्यमासाठी उमेदवार पात्र राहील.

4. इयत्ता 11 वी ते 12 वी -

1) शैक्षणिक अर्हता- संबंधित विषय गटातील किमान द्वितीय श्रेणीतील पदव्युत्तर पदवी

व्यावसायिक अर्हता- B.Ed/B.A.Ed/B.Sc.Ed/M.P.Ed. (For Health and Physical Education Subject only) II) दोन विषय मिळून एक पूर्णवेळ पदाची शैक्षणिक अर्हता इयत्ता अकरावी व बारावी या गटातील दोन विषयासाठी एक पूर्णवेळ पदाची जाहिरात असेल तर या जाहिरातीतील दोन्ही विषयासाठी उमेदवार किमान द्वितीय श्रेणीत पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, नसल्यास असा उमेदवार या दोन विषयातील पदासाठी नियुक्तीस पात्र असणार नाही.

माध्यम- शालांत परीक्षा/ पदवी / पदव्युत्तर पदवी / व्यावसायिक अर्हता, ज्या ज्या माध्यमातून शिक्षण घेतले असेल त्या त्या माध्यमासाठी उमेदवार पात्र राहील. 

क) उमेदवारांची वयोमर्यादाः-

1. इयत्ता 9 वी ते 12 वी वर्गाकरिता खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील पदांकरिता उमेदवारांची वयोमर्यादा महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली 1981 मध्ये 9 (4) ब अन्वये प्राथमिक शाळेशिवाय इतर कोणत्याही शाळेत कोणत्याही पदावर नियुक्ती करताना उमेदवाराचे वय किमान 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
2. इयत्ता पहिली ते आठवी वर्गाकरिता शिक्षण सेवक पदाकरिता बालकाचा सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार शासनाने वेळोवेळी निश्चित केल्यानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील. शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय दिनांक 07/02/2019 मध्ये नमूद मुद्दा क्रमांक 9 मध्ये नमूद केल्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी 40 (38+2) व आरक्षित प्रवर्गासाठी 45 (43+2) अशी राहील.
3. उमेदवाराचे वय पवित्र पोर्टल वरील पहिल्या टप्प्यातील जाहिरातीच्या म्हणजेच दिनांक 16/10/2023 रोजी चे वय ग्राह्य धरण्यात आले आहे.

ड) निवडीची कार्यपद्धती :-

1. मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक 5059/2017 मध्ये दिनांक 21/11/2018 रोजी खालील प्रमाणे आदेश पारित केले आहेत.
a) The validity of Rules 6(2) and 6(3) and 9 (2A) and (2B) of MEPS Rules, introduced on 22/06/2017, is upheld on the touchstone of competency of the State Government and Article 19(1) (g) of the Constitution of India.
b) The procedure for selection and appointment of the teachers in the private schools, receiving or eligible to receive full or partial grant-in-aid from the State exchequer, shall be governed by provisions of Rule 6(1),(2) and (3) read with Rule 9 (2A) and (2B) of MEPS Rules, as are interpreted by us in paras 34,36,39 and 44 of the judgement without interfering with the right of the Management and/ of the School Committee to select and appoint the qualified, eligible and suitable candidate by holding the personal interview.
2. पवित्र प्रणालीतील स्व-प्रमाणपत्रांमध्ये उमेदवाराने नोंद केलेल्या माहितीच्या आधारे (आरक्षण प्रवर्ग समांतर आरक्षण शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता इत्यादी) संस्थेने दिलेल्या जाहिरातीतील रिक्त पदानुसार गुणानुक्रमे जास्तीतजास्त 1:10 या मर्यादेत (समांतर आरक्षणासह व उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उमेदवार उपलब्ध करून दिलेले आहेत.
3. उपरोक्त अ.क्र. 2 मध्ये नमूद केल्यानुसार 1:10 या प्रमाणाच्या मर्यादेत, उमेदवारांचे अभियोग्यता व बु‌द्धिमत्ता चाचणीतील (TAIT) गुण, उमेदवारांनी दिलेला प्राधान्यक्रम, माध्यम, विषय आरक्षण, समांतर आरक्षण इत्यादीचा एकत्रित विचार केलेला आहे.
4. वरील अ.क्र. 2 व 3 मधील बाबी विचारात घेऊन उमेदवार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडला गेला आहे. त्यामुळे व्यवस्थापनस्तरावर या उमेदवाराचा गट, विषय व प्रवर्ग यामध्ये निवडीच्या वेळी बदल करता येणार नाही.
    तथापि, मुलाखतीसाठी यादी तयार करताना आरक्षित प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातील पदासाठी गुणवत्तेनुसार पात्र ठरत असल्यास, अशा उमेदवारांना त्याच्या मूळ प्रवर्गाऐवजी गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात आलेले आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर अंतिम निवडीच्या वेळी सदर उमेदवार गुणानुक्रमे खुल्या प्रवर्गासाठी पात्र ठरत नसल्यास अशा उमेदवारांचा त्यांच्या मूळ प्रवर्गात देखील ( जाहिरातीत मूळ प्रवर्गाची जागा असल्यास) गुणवत्तेनुसार निवडीसाठी विचार करावा.
5. मुलाखत व अध्यापन कौशल्य यांमध्ये उमेदवारांना समान गुण प्राप्त झाल्यास सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 2/12/2017 रोजीच्या शासन पूरकपत्रानुसार व शासन पत्र दिनांक 06/08/2024 नुसार गुणानुक्रमे निवडयादी तयार करण्यासाठी पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. त्यासाठी सदर शासन पूरक पत्राचा विचार करूनच व्यवस्थापनास प्रविण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता (General Merit List) यादीमध्ये जो क्रम दिला आहे त्या क्रमाचा विचार उमेदवाराच्या निवडीसाठी करता येईल. या उपरही सदरच्या तरतुदी खालील प्रमाणे आहेत.
अ) मुलाखत व अध्यापन कौशल्य यांमध्ये समान गुण असल्यास आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
ब) समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील (अ) नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे.
क) वरील अनुक्रमांक (अ) व (ब) या दोन्ही अटी मध्ये देखील समान गुण ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास (म्हणजेच दिनांक 12/02/2023) पदासाठीच्या उच्चतर शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता (इयत्ता बारावी / पदवी / पदव्युत्तर पदवी/ डी.एड., बी.एड./ समकक्ष) यामधील जास्त गुण प्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावे.
6. व्यवस्थापनाकडून संबंधित उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य द्वारे उच्चतम गुण प्राप्त झालेल्या उमेदवाराची रिक्त पदावर नियुक्ती करण्यात येईल. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांची व्यवस्थापन गुणांनुक्रमे यादी तयार करून पवित्र पोर्टलवरील व्यवस्थापनाच्या लॉगीनवर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
7. मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थेने उमेदवारांबाबत उपस्थित, अनुपस्थित, पात्र, अपात्र, प्राप्त गुण, आवश्यक तेथे अभिप्राय या सर्व बाबींची नोंद केल्यानंतर संबंधित शैक्षणिक संस्थेची अंतिम निवडयादी पोर्टलवर तयार होईल.
8. निवड झालेल्या सर्वच उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी संबंधित शिक्षणाधिकारी यांचेकडून केल्यानंतरच निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित शैक्षणिक संस्थेकडून नियुक्ती आदेश देता येईल.
9. सदर नियुक्ती आदेशामध्ये मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद व नागपूर येथे दाखल असलेल्या विविध याचिकांच्या निर्णयांच्या अधीन राहून नियुक्ती देत असल्याचे नमूद करण्यात यावे.
10. उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टलवर Interview Status मध्ये माहितीची नोंद पूर्ण केल्यानंतरच निवड केलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावेत.
11. माजी सैनिक, अंशकालीन कर्मचारी, प्रकल्पग्रस्त. भूकंपग्रस्त. खेळाडू या समांतर आरक्षणाच्या आधारे निवड झालेल्या उमेदवारांच्या बाबतीत संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याकडून पडताळणी झाल्यानंतरच नियुक्ती आदेश देण्यात यावेत.
12. व्यवस्थापनाने निवड केलेल्या उमेदवारास नियुक्ती आदेश प्राप्त झाल्यानंतर 7 कार्यालयीन दिवसांमध्ये हजर व्हावे लागेल, उक्त कालावधीमध्ये उमेदवार हजर न झाल्यास व्यवस्थापन गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची निवड करेल. निवडलेल्या प्रत्येक उमेदवारास हजर होण्यासाठी कमाल 7 कार्यालयीन दिवसाची मर्यादा असेल.
13. मुलाखतीसह शिक्षक पद भरती प्रक्रियेसाठी एका जागेसाठी जास्तीतजास्त 1:10 या प्रमाणात उमेदवार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडले जाणार आहेत. यामधील नियुक्ती आदेश दिलेला उमेदवार विहित कालावधीत रुजू न होणे, कागदपत्र तपासणीमध्ये अपात्र ठरणे अशा इतर कोणत्याही कारणांमुळे रिक्त राहिलेल्या पदांवर व्यवस्थापन गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची निवड करेल. परंतु असे करताना वरील सर्व निर्देशाचे तंतोतंत पालन करून पुढील उमेदवारांना नियुक्तीसाठी विचारात घेईल.
14. मा. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथील याचिका क्रमांक 5059/2019 मध्ये दिनांक 21/11/2018 रोजी दिलेल्या आदेशानुसार शासन निर्णय दिनांक 07/02/2019 अन्वये संस्थेकडे प्राप्त झालेल्या यादीतील (TAIT) परीक्षेतील उच्च गुण नसणाऱ्या उमेदवाराची निवड करावयाची झाल्यास शाळा समितीस लिखित कारणे नमूद करावी लागतील. तसेच (TAIT) परीक्षेतील कमी गुण असलेल्या उमेदवाराची निवड होत असल्यास अंतिम निकालामध्ये त्याबाबतची कारणे स्पष्टपणे नमूद करावीत. तसेच शाळा समितीने याबाबतचे अभिलेख जतन करून ठेवणे अनिवार्य राहील.

इ) मुलाखतीसह पदभरतीसाठी राज्यातील खाजगी व्यवस्थापनाकरिता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी वेळापत्रक :-

1. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता राज्यस्तरावरून 09/08/2024 ते 31/08/2024 हा कालावधी निश्चित करण्यात येत आहे.
2. मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी व्यवस्थापनाकडील पोर्टलवर दिलेल्या रिक्त पदांच्या जाहिरातीनुसार उपलब्ध होणारे उमेदवार विचारात घेता व्यवस्थापनाला आपल्या स्तरावरून एक किंवा अधिक मुलाखतीचे पॅनल तयार करून मुलाखत व अध्यापन कौशल्याची कार्यवाही पूर्ण करता येईल यासाठी समितीमध्ये आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा समावेश करावा.
3. राज्यात पावसाळी वातावरणाचा विचार करता पूरपरिस्थिती इत्यादी सारखी नैसर्गिक आपत्ती विचारात घेता व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडलेल्या सर्वच उमेदवारांना सहभागी होता येईल या दृष्टीने व्यवस्थापनाने त्यांचे स्तरावर योग्य ते नियोजन करावे.
4. व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडलेल्या सर्वच उमेदवारांना आपल्या स्तरावरून त्यांच्या ई-मेल / मोबाईल इत्यादी माध्यमांद्वारे विहित मुदतीत मुलाखत घेण्यात येत असल्याचे मुलाखतीचे ठिकाण, मुलाखतीचा दिनांक व वेळ इत्यादी बाबत कळवावे जेणेकरून सर्वच शिफारस पात्र उमेदवार मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी प्रक्रियेत सहभागी होतील.
5. बहुतांश उमेदवार एकापेक्षा अधिक व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी निवडले गेले आहेत अशा उमेदवारांपैकी काही उमेदवारांना एकाच वेळी दोन अथवा अधिक व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर अशा अन्य प्रकारच्या अपवादात्मक परिस्थितीत उमेदवारांची येणारी विनंती विचारात घेऊन संबंधित उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या वेळापत्रकामध्ये आवश्यक तो बदल करावा जेणेकरून मुलाखतीसाठी

शिफारस झालेल्या सर्वच उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्य यासाठी हजर राहता येईल.

6. शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती दरम्यान अडचणी येत असल्यास संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. उमेदवारांना मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी संस्थेकडे नोडल अधिकारी यांचे नाव, पदनाम, मोबाईल क्रमांक व संस्थेचा ई-मेल आयडी इत्यादी माहिती शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून उमेदवार, संस्था व शिक्षण विभाग यांच्यामध्ये समन्वय राहील.

फ) उमेदवारांच्या कागदपत्राची तपासणी/पडताळणी :-

व्यवस्थापनाकडे मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झालेल्या उमेदवारांचे पवित्र पोर्टलवरील स्वप्रमाणपत्र व पोर्टलवर अपलोड केलेली आवश्यक सर्व कागदपत्रे व्यवस्थापनास ऑनलाईन पडताळणीसाठी त्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. या सुविधेचा वापर करून व्यवस्थापनाने उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीस येण्यापूर्वी पूर्वतयारी करता येईल. कागदपत्र पडताळणीचे वेळी शिक्षणाधिकारी यांचा प्रतिनिधी संस्थेने ठरविलेल्या वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहील. तथापि, सदर प्रतिनिधी प्रत्यक्ष मुलाखत व अध्यापन कौशल्याच्या कार्यवाहीमध्ये यांचा कोणताही सहभाग राहणार नाही.
मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी उपस्थित राहत असलेल्या सर्व उमेदवारांचे बाबतीत त्यांच्या स्व-प्रमाणपत्रांमध्ये नोंद केलेली माहिती मूळ कागदपत्रांवरून पडताळल्यानंतर उमेदवार पात्र असल्यास, अशा उमेदवाराची मुलाखत संबंधित व्यवस्थापन घेईल.
मुलाखत व अध्यापन कौशल्यानंतर नियुक्तीसाठी अंतिम निवड झालेल्या सर्व उमेदवारांची मूळ कागदपत्रे संबंधित शिक्षणाधिकारी/उच्च माध्यमिक पदांबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक तपासतील आणि उमेदवार निवड झालेल्या पदासाठी पात्र आहे अथवा नाही याबाबत पडताळणीनंतर स्पष्ट अभिप्राय व्यवस्थापनास कळवतील.
उमेदवाराने स्व-प्रमाणपत्र पूर्ण करताना अपलोड केलेली कागदपत्रे व ज्या पदासाठी निवड झालेली आहे त्या पदासाठी आवश्यक असलेल्या खालील प्रमाणे कागदपत्राची प्रमाणपत्राची तपासणी/पडताळणी करावी.

1. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा गुणपत्रक (गुणपत्रक नसल्यास स्व प्रमाणपत्रातील नमूद असलेले गुण विचारात घेण्यात येतील.)
2. शालांत परीक्षा प्रमाणपत्र (जन्मतारखेच्या पडताळणीसाठी )
3. उच्च माध्यमिक परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र (इयत्ता 1 ली ते 5 वी गटातील पदासाठी)
4. डीएड/डी.एल.एड. परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5. शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र (TET/CTET-Paper-1,TET/CTET-Paper-2 (लागू असल्यास)
6. पदवी/पदव्युत्तर पदवी परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
7. व्यावसायिक अर्हतेसाठी बीएड/बीपीएड (फक्त शारीरिक शिक्षण पदासाठी) एम.पी.एड. (फक्त शारीरिक शिक्षण पदासाठी )
8. अ) उमेदवाराची निवड अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब). भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) विशेष मागास प्रवर्ग (SBC), इतर मागास प्रवर्ग (OBC), आर्थिक दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातून निवड झाली असल्यास अशा उमेदवारांच्या जातीच्या प्रमाणपत्रांची व जात पडताळणी प्रमाणपत्रांची तपासणी व्यवस्थापनाने करावी.
ब) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या प्रवर्गातील उमेदवारांना उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करण्याची आवश्यकता नाही.
क) विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड) विशेष मागास प्रवर्ग (SBC), इतर मागास प्रवर्ग (OBC), या प्रवर्गातील उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) सादर करणे आवश्यक राहील व्यवस्थापनाने सदरचे प्रमाणपत्रांची तपासणी करावी.
ड) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) उमेदवारांनी उच्च व उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) ची आवश्यकता नाही. तथापि, त्यांच्यासाठी सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले (EWS) प्रमाणपत्र आवश्यक राहील.
9. जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate)
10. दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असेल तेथे)
11. अनाथ असल्याबाबतचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
12. समांतर आरक्षणातून निवड झाली असल्यास त्याबाबतचा पुरावा.
13. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) (लागू असल्यास)
14. उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठीचे आरक्षण, प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्तांसाठी आरक्षण, संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान, ओळखपत्र बाबत, दिव्यांग व्यक्तीसाठीच्या आरक्षणाबाबत, माजी सैनिक आरक्षण, खेळाडूंसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा दावा, विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याबाबत इत्यादी. वरील सर्व प्रकारच्या सवलतीच्या तरतुदीबाबत उमेदवारांसाठी दिनांक ०१/०९/२०२३ रोजी पवित्र पोर्टलवर सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत सदर सूचनांचे अवलोकन करावे.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon