Anna Bhau Sathe Research And Training Institute
अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करणेबाबत...Anna Bhau Sathe Research and Training Institute GR
महाराष्ट्र शासन
दिनांक :- १६ जुलै, २०२४
वाचा:-
१) शासन निर्णय समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग क्र. युडीए-१०७८/डी-
२५. दि.२२.१२.१९७८.
२) शासन निर्णय समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग क्र. सीबीसी १०/२००१/प्र.क्र.१४४/मावक-५, दि.१.८.२००३.
३) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. आनप्रस- २००५/प्र.क्र.३८३/ मावक-२, दि.३०.०४.२००८.
४) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सीबीसी- १०/२००८/प्र.क्र.५५२/मावक, दि.३१.१२.२०११.
५) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. गृहनि- २०२३/प्र.क्र.९१(२)/बांधकामे, दि.११.३.२०२४.
६) मा. मंत्रिमंडळाचा दि.११.७.२०२४ रोजीचा निर्णय.
प्रस्तावना:-
अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनूसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी, विभागाच्या शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व विशेष सहाय्य विभाग, क्र. सीबीसी १०/२००१/ प्र.क्र.१४४/ मावक-५, दि.१.८.२००३ अन्वये, क्रांतीगुरू लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग गठीत करण्यात आला होता. या आयोगाने शासनास ८२ शिफारशी केल्या होत्या. आयोगाने केलेल्या शिफारशींपैकी शिफारस क्र. ७२ येथे " साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मुंबई येथे राष्ट्रीय स्मारक उभे करून त्यात संशोधन व ज्ञानार्जन यांच्या अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात." अशी शिफारस करण्यात आलेली आहे.
तसेच सन २०२४-२५ च्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यात येणार आहे" अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने, मा. मंत्रिमंडळाच्या दि. ११.०७.२०२४ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती (मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा) या समाजाच्या विकासाकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय :-
हेही वाचाल 👇
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती / पुण्यस्मरण दिन मराठी माहिती जीवन चरित्र
मा. मंत्रिमंडळाच्या दि.११.०७.२०२४ रोजीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या धर्तीवर मातंग व तत्सम जाती (मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा) या समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेची स्थापना करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे.
१) मातंग समाजाच्या विकासाकरीता अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेची स्थापना, कंपनी नोंदणी कायदा, २०१३ अंतर्गत नियम ८ अन्वये करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
२) सदर संस्थेचे ध्येय व उद्दीष्टे खालीप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत.
१. संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणून समता विचारपीठ चालू ठेवणे आणि विकास करणे.
२. विविध क्षेत्रामध्ये प्रचलित असलेली "सामाजिक समता" या विषयी संशोधन करून सामाजिक समता तत्वप्रणाली समाजामध्ये जास्तीत जास्त परिणामकारक कशी होईल या बाबत संशोधन करणे.
३. सामाजिक समता या विषयाशी निगडीत असे व्यावसायिक ज्ञान तसेच अशा विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी तरुण व्यक्तींना सुविधा उपलब्ध करून देणे व त्यांच्या ज्ञानामध्ये समाजशास्त्राच्या दृष्टीकोनातून सर्वांगीण वाढ होईल असे प्रशिक्षण देणे.
४. समाजातील विविध स्तरामध्ये "सामाजिक समता" या तत्वप्रणालीवर आधारित सहकाराच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि त्याबाबत अधिक संशोधन करणे व त्यानुसार अनुभव, विचार व परिवर्तन करणे बाबत समाजामध्ये अधिक चांगली जाणीव निर्माण करून "सामाजिक समता " या कार्यास उचलून धरणे.
५. संस्थेच्या उद्दिष्टानुसार सुकर शिक्षणक्रम, संमेलन, व्याख्यान, चर्चासत्र, परिसंवाद असे इतर कार्यक्रम आयोजित करण्याचे काम हाती घेणे.
६. संस्थेच्या उदिष्टांशी संबंधित अशी पुस्तके, नियतकालिके आणि संशोधनात्मक, निबंध प्रकाशित करणे.
७. संस्थेच्या उद्दिष्टानुसार प्रस्थापित झालेल्या मान्यताप्राप्त संस्था आणि संघटना यांच्याशी सहकार्य करणे तसेच त्यांच्याशी समन्वय साधणे आणि त्यांना त्यांच्या कार्यामध्ये प्रोत्साहन देणे.
८. शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्ट-अप, रोजगारनिर्मिती, प्रचार, प्रसार, प्रसिध्दी, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक विकास करणे व त्याच्याशी निगडीत योजना राबविणे.
९. लोकगीते, लोकसंस्कृती, लोककला संदर्भात संशोधन, प्रशिक्षण, प्रचार, प्रसिध्दी करणे. १०. परंपरागत व्यवसायांना चालना देणे, आर्थिक मदत करणे.
११. कला, कौशल्य यांचे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय स्तरावर परिषद भरविणे व सहभागी होणे.
१२. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य प्रसिध्द करणे व अप्रकाशित साहित्य प्रसिध्द करणे आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये भाषांतर करणे.
३) समाजाचे पुनःसरण उदिष्टानुसार परितोषिके, पुरस्कार, शिष्यवृत्ती, विद्यावेतन यांना मान्यता देणे आणि त्या प्रदान करणे.
४) अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेकरीता खालीलप्रमाणे पदनिर्मिती करण्यास तत्वतः मान्यता देण्यात येत आहे.
अ.क्र. पदनाम मंजूर पदे वेतनश्रेणी
१ व्यवस्थापकीय संचालक १
२ निबंधक १
S-२५-७८८००-२०९२००
S-१५-४१८००-१३२३००
एकूण २
५) अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेअंतर्गत खालील विभाग स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
१. संशोधन विभाग
२. प्रशिक्षण विभाग
३. योजना विभाग
४. विस्तार व सेवा विभाग
५. लेखा विभाग
६. आस्थापना विभाग
६) सदर संस्थेचे कामकाज हे अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) चिरागनगर, घाटकोपर, मुंबई येथील स्मारक इमारतीमधून करण्यात येईल. सदर स्मारकामध्ये अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) कार्यालयाकरीता जागा निश्चित करण्याची कार्यवाही झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), मुंबई यांनी करावी. या प्रस्तावित इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने भाड्याची इमारत घेऊन कामकाज सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
७) अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या कार्यालयाच्या कामकाजाकरीता व्यवस्थापकीय संचालक व निबंधक ही पदे वगळता इतर पदे तात्पुरत्या स्वरूपात सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि.१७.१२.२०१६ मधील तरतूदीनुसार सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा करार पध्दतीने घेऊन, बाह्ययंत्रणेव्दारे तसेच अतिरिक्त पदभार देऊन कर्मचाऱ्यांच्या सेवा उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
८) सद्य:स्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे या संस्थेच्या मंजूर तरतूदीतून अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेकरीता मागणीप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात निधी उपलब्ध करून घेऊन खर्च करण्यात यावा. तसेच भविष्यात आर्टीकरीता नव्याने लेखाशिर्ष निर्माण करून आर्थिक तरतूद करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
शासन निर्णय क्रमांकः सान्यावि-२०२४/प्र.क्र.२८/बांधकामे
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०२४०७१६१४४१५१११२४ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
(सो. ना. बागुल)
सह सचिव, महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. सान्यावि-२०२४/प्र.क्र.२८/बांधकामे पहिला मजला, मंत्रालय विस्तार भवन,
मुंबई
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon