![]() |
Ananddai Shaniwar Pustika STD 1st To 8th |
आनंददायी शनिवार
प्रस्तावना :
"The joy of learning is as indispensable in study as breathing is to running. Where it is lacking there are no real students, but only poor caricature of apprentices who, at the end of their apprentices, will not even have a trade." असे आनंददायी अध्ययनाचे महत्त्व अधोरेखित करणारे विचार फ्रेंच तत्त्वज्ञ सायमन वेल यांनी मांडलेले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींना अपेक्षित असलेल्या शैक्षणिक पद्धतीनुसार विद्यार्थ्यांचा विकास हा कृतियुक्त पद्धतीने व्हावयास हवा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील भाग १ मध्ये शालेय शिक्षण यात विद्यार्थ्यांचे शिकणे हे सर्वांगीण, एकात्मिक आनंददायक आणि रंजक असले पाहिजे असे नमूद करण्यात आले आहे. यानुसार विदयार्थ्यांच्या शालेय जीवनात आनंददायी कृती असण्याची गरज प्रकर्षाने नमूद करण्यात आलेली आहे. यासाठी सर्व स्तरांवर प्रात्यक्षिक शिक्षण, कला, खेळ, कथाकथन आधारित अध्यापन यांचा समावेश करण्यासाठी सुचविण्यात आले आहे. म्हणून 'आनंददायी शनिवार' हा उपक्रम शासनमान्य सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीसाठी राबवण्यात येणार आहे.
सध्याच्या काळात लहानवयातही विद्यार्थ्यांना ताणतणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. म्हणून आनंददायी शनिवार या उपक्रमातून अभ्यासक्रमाशी जोडण्यात आलेल्या विविध आनंददायी कृतीतून विद्यार्थ्यांच्या तर्कसंगत विचार, सहानुभूती, सहकार्यवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, जिज्ञासूवृत्ती, उद्योजकता यांसारख्या क्षमतांचा विकास होणार आहे. प्रत्येक शालेय शनिवारी हा उपक्रम राबविणे आवश्यक असून याच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन उपस्थितीमध्ये देखील खूप वाढ होईल. गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
आनंददायी शनिवार हा उपक्रम राबविण्यासाठी शाळेतील अंमलबजावणीसाठी प्रत्येक आवश्यक घटक शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, समाज व विद्यार्थी या सर्वांनी एकत्रित कार्य करणे आवश्यक आहे. यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. हा उपक्रम अभ्यासक्रमाशी निगडित कृतींशी संबंधित असल्याने सर्व विषय शिक्षकांनी अभ्यासक्रमाशी सुसंगत अशा कृतींची निवड करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. या कृतिपुस्तिकेत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करता येऊ शकतील अशा विविध विषयांशी संबंधित मार्गदर्शक कृतींचा समावेश केलेला आहे, परंतु शिक्षक याशिवाय वेगळ्या नावीन्यपूर्ण कृतींचाही समावेश करू शकतात. याची मुभा शिक्षकांना देण्यात आलेली आहे.
संकल्पना :
१) आनंददायी शनिवार या उपक्रमातून आनंददायी अध्ययनातून विदयार्थी गुणवत्तेमध्ये वाढ होईल. या उपक्रमातून अभ्यासक्रमाशी निगडित खेळ, कला, व्यावसायिक शिक्षण, कृतीद्वारे शिक्षण, क्षेत्रभेटी, इत्यादींवर भर देण्यात आलेला आहे.
२) 'आनंददायी शनिवार' या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी शाळेतील प्रत्येक विषयशिक्षकांनी एकत्रित येऊन इयत्ता पहिली ते दुसरी, इयत्ता तिसरी ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी या शैक्षणिक स्तरानुसार नियोजन व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. (परिस्थितीनुसार यात लवचिकता असू शकेल.)
३) आनंददायी शनिवार उपक्रमात आनंददायी विविध कृतींचा समावेश आहे. विद्यार्थी सर्व कृती आनंदाने करतात. प्रत्यक्ष कृती मधून शिक्षणातील कौशल्य प्राप्ती, अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे.
४) विशेष गरजा असलेल्या मुलाचा समावेश करण्यासाठी त्याला पालक, विशेष शिक्षक, विद्यार्थी यांचे साहाय्य प्रदान केले जाणार आहे.
५) या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील 'आवश्यक विषय, कौशल्ये आणि क्षमतेचे अभ्यासक्रमिक एकात्मीकरण' या घटकातील इयत्ता सहावी ते आठवी दरम्यान विद्यार्थ्यांना 'व्यावसायिक कलांचा' प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी 'दहा दिवस दप्तराविना' या उपक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे.
६) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० मधील टास्क क्र. ९२ अंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीसाठी अभ्यासक्रमाशी निगडित आनंददायी कृतींची निर्मिती करण्यास सूचित करण्यात आलेले आहे. याअंतर्गत या उपक्रमाचे आयोजन करायचे आहे.
आनंददायी उपक्रमाची उद्दिष्टे :
१) विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
२) विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक व भावनिक कौशल्य विकसित करणे.
३) शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे.
४) विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
५) विदयार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे व नैराश्यावर मात करण्याची क्षमता विकसित करणे.
६) विद्यार्थ्यांची शिक्षणात अभिरुची वाढविणे.
७) विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता संवर्धनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे.
८) विद्यार्थ्यांचे गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी करणे.
९) विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती व नेतृत्व गुण यांचा विकास करणे.
१०) विद्यार्थ्यांना विविध व्यवसाय व उद्योगांबाबत माहिती देणे.
११) विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्यांचा विकास करणे.
१२) विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व पटवून देणे.
१३) कृषीविषयक आवड व आदर निर्माण करणे. कृषीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती देणे.
१४) लोकसेवा अधिनियमबाबत जागृती निर्माण करणे.
१५) विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे.
१६) कृतिशील अध्ययनातून क्षमतापूर्ण सक्षम उत्पादक गट तयार करणे.
१७) विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी आनंददायी वातावरण उपलब्ध करून देणे.
१८) विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण करणे.
आनंददायी शनिवार कार्यपद्धती :
या वर्षी सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्रापासून 'आनंददायी शनिवार' उपक्रम २०२४-२५ या वर्षापासून राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम शासनमान्य सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. या उपक्रमासाठी सर्व विषयशिक्षकांनी एकत्रित कार्य करायचे आहे. आपल्या विषयांतर्गत येणाऱ्या उपक्रमांची निवड या कृतिपुस्तिका संचयिकेतून किंवा खाली निश्चित करण्यात आलेल्या आराखड्याप्रमाणे स्वतः निर्मिती करायची आहे. यासाठी उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यपद्धतीचा आराखडा पुढीलप्रमाणे आहे.
१) उपक्रमाचे नाव
२) पूर्वनियोजन
३) विकसित होणारे कौशल्य
४) आवश्यक साधनसामग्री
५) अंमलबजावणी दरम्यानच्या कृती
• शिक्षक कृती
• विद्यार्थी कृती
६) संदर्भ
'आनंददायी शनिवार' उपक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार उपक्रम अंमलबजावणीसाठी शैक्षणिक स्तरनिहाय उपक्रमांची मांडणी करण्यात आली आहे. (इयत्ता पहिली व दुसरी, इयत्ता तिसरी ते पाचवी, इयत्ता सहावी ते आठवी) यासाठीचा स्तर किंवा इयत्तानिहाय शाळेतील शिक्षकांनी एकत्र येऊन वर्गातील किंवा वर्गाबाहेरील कृती कराव्यात, त्यात खालील बाबींचा समावेश करता येईल.
स्तर १ ते ३ : इयत्ता पहिली ते आठवी
अनुक्रमणिका
अ.क्र. स्तर इयत्ता पृष्ठ क्रमांक
१) स्तर १ इयत्ता पहिली ते दुसरी १७ ते ७२
२) स्तर २ तिसरी ते पाचवी ७३ ते १३४
३) स्तर ३ सहावी ते आठवी १३५ ते २५३
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon