DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Maharashtratil Vachan Chalval Upkram GR

 Maharashtratil Vachan Chalval Upkram GR

सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव- २०२४" हा उपक्रम राबविणेबाबत.

दिनांक : १६ जुलै, २०२४.

दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे. महवाचन उस्तव २०२४ अंतर्गत आपल्याला 


या वेब एप्लिकेशन्स वर आपली शाळांनी माहिती भरायची आहे. 
याकरिता 
1. शाळांनी त्यावर लॉगिन करून आपली प्राथमिक माहिती भरावी. 
2. यात शाळांनी आपले user id तयार करायचा आहे. 
3. त्या युजर id आपले विद्यार्थ्याची माहिती अपलोड करायचा आहे. त्यामुळे शाळांनी आपला युजर आयडी नीट तयार करावयाचा आहे. तसेच त्यांचा पासवर्ड ही लक्षात ठेवायचं आहे. 
५. तालुका, जिल्हा, विभागीय, तसेच राज्यस्तर असे रिपोर्ट तयार होतील. त्यावरून आपल्या अधिनास्त कोण किती काम झाले याचा मागोवा घेऊन आपले काम करता पूर्ण करता येईल.

संदर्भ:- 
१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२४/प्र.क्र.३६०/एसडी-४, दिनांक २२.११.२०२३.
२) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र क्र.जा.क्र.मप्राशिप/सशि/मवा/२०२४-२५/१९६७, दिनांक ०३.०७.२०२४.

प्रस्तावना :-

    वाचन हे व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. वाचनामुळे ज्ञानवृद्धी होते, विचारांची क्षितिजे विस्तारित होतात, आणि व्यक्तीमध्ये सर्जनशीलता वाढते. विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे, आणि शैक्षणिक पुस्तकांचे वाचन करून व्यक्ती नवीन माहिती आणि दृष्टिकोन प्राप्त करते. वाचनाच्या सवयीमुळे भाषिक कौशल्ये सुधारतात, आणि व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते. वाचन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. तसेच, वाचनामुळे व्यक्तीला आत्मविश्वास आणि आत्म-साक्षात्कार होतो. म्हणूनच, वाचन ही एक आवश्यक व उपयुक्त क्रिया आहे. व्यक्तीच्या विकासासाठी आणि समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी वाचन संस्कृती समाजात रुजविणे आवश्यक आहे.

    शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांच्या अभ्यासाच्या गतीत वाढ होते. वाचनाच्या सवयीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. तसेच वाचनामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळते.

    राज्यातील सर्व शाळांमध्ये "महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम राबविण्याबाबतचा निर्णय दिनांक २२ नोव्हेंबर, २०२३ रोजीच्या संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयाने घेण्यात आला होता. मा. राज्यपाल महोदय यांच्या शुभहस्ते व मा. मुख्यमंत्री, मा. शालेय शिक्षण मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ०५ डिसेंबर, २०२३ रोजी सदर उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सदर उपक्रमामध्ये ६६,००० शाळा व ५२ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सदर उपक्रमास विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. सदर उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यात आला होता. सदर उपक्रमास रिड इंडिया सेलिब्रेशन यांनी विना आर्थिक मोबदला सहकार्य केले होते.

    सन २०२४-२५ या वर्षात स्टार्स या केंद्र पुरुस्कृत योजनेंतर्गत SIG १ मधील परि. १.२. ७ अन्वये Foundation literacy & Numeracy या मुख्य घटकांतर्गत NIPUN Utsav, Reading campaign & other State initiatives या उप घटकांसाठी रु. ८७५.०० लक्ष इतका निधी उपलब्ध आहे. या उप घटकांच्या अंमलबजावणीसाठी तसेच सन २०२३-२४ मधील वाचन चळवळ मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरल्याच्या पार्श्वभूमीवर सन २०२४-२५ या वर्षात राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-

    राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सन २०२४-२५ या वर्षात "महावाचन उत्सव-२०२४" हा उपक्रम रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे. या उपक्रमाकरिता ज्येष्ठ अभिनेते श्री. अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड करण्यास देखील शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

सदर उपक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:-

१. उपक्रमाची व्याप्ती:-
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता ३ री ते १२ वी या इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविणे अपेक्षित आहे. यासाठी इयत्ता ३ री ते ५ वी इयत्ता ६ वी ते ८ वी व इयत्ता ९ वी ते १२ वी अशा तीन इयत्तानिहाय वर्गवारी निश्चित करण्यात येत आहेत :-

२. उपक्रमाची उद्दिष्टेः-
1) वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे.

ii) विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे.
iii) मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे.
iv) दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करुन देणे.
v) विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्व विकासास चालना देणे.
vi) विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासास चालना देणे.

३. उपक्रमाचा कालावधी:-

दिनांक २२ जुलै, २०२४ ते दिनांक ३० ऑगस्ट, २०२४ या कालावधीत "महावाचन उत्सव-२०२४ हा उपक्रम राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी राबवावयाचा आहे.

४. उपक्रमाचे स्वरुपः-
1) या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी सुयोग्य असे वेब पोर्टल विकसित करावे व त्याचा तपशील राज्यातील सर्व शाळांना उपक्रमाच्या नोंदणीकरिता प्राप्त होईल याची दक्षता घ्यावी.
ii) या उपक्रमांतर्गत विद्यार्थी त्याच्या आवडीनुसार व इच्छेनुसार अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मराठी साहित्य विश्वातील नावाजलेल्या साहित्यकांचे विविध साहित्य, कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे इ. साहित्याची निवड करुन वाचन करतील.
iii) सर्व सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील व तो विचार लिखित स्वरुपात महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील. यासाठी १५० ते २०० शब्दांची मर्यादा असेल.
iv) सदर उपक्रमातील सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाचा सारांश देणारा एका मिनिटाची व्हिडिओ/ऑडिओ क्लिप महावाचन उत्सव २०२४ च्या पोर्टलवर अपलोड करतील.
v) वाचनीय पुस्तकांचे ग्रंथालय प्रदर्शन व पुस्तक मेळावे भरविण्याची जबाबदारी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर अनुक्रमे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांची असेल. यासाठी त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय / खाजगी ग्रंथालयाची मदत घ्यावी. कार्यक्षेत्रातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी यासाठी वर नमूद अधिकाऱ्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.

५. अंमलबजावणी करणारी यंत्रणाः-
सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची नियुक्ती करण्यात येत आहे. रिड इंडिया सेलिब्रेशन यांच्या सहकार्याने सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची राहील. जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर सदर उपक्रमाच्या अंमलबजावणीकरिता शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राबाबत ही जबाबदारी संबंधित समकक्ष अधिकाऱ्यांची असेल.

६. परिक्षण व पारितोषिके
1) उपरोक्त परिच्छेद ४ (iii) व (iv) मधील नमूद उपक्रमासाठी तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग व राज्य या स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रामांकावरील विद्यार्थ्यास पारितोषिक अनुज्ञेय असेल. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राचा दर्जा स्वतंत्र शैक्षणिक विभागाप्रमाणे असेल. यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकाबाबत लिखित/व्हिडिओ/ऑडिओ क्लिप या स्वरुपात मांडलेल्या विचारांच्या आधारे मूल्यांकन करण्यात येईल. प्रत्येक स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावरील विद्यार्थ्यांची निवड तीन वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे करावयाची आहे.
ii) पारितोषिकांचे स्वरुप काय असावे याचा निर्णय राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी घ्यावा.
ⅲ) शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अन्य एका स्वतंत्र शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा-२ हे अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येणार आहे. या शासन निर्णयान्वये केंद्र, तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग व राज्य स्तरावर सहभागी शाळांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी त्या त्या स्तरावर समित्यांचे गठन प्रस्तावित आहे. याच समित्यांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा- टप्पा-२ मधील सहभागी शाळांच्या कामगिरीचे मूल्यांकन करतेवेळी महावाचन उत्सव-२०२४ या उपक्रमात सहभागी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करणे आवश्यक राहील. मूल्यांकनाची प्रक्रिया दिनांक ०५.०९.२०२४ रोजीच्या नियोजित राष्ट्रीय शिक्षक दिन कार्यक्रमापुर्वी करणे आवश्यक राहील. या कार्यक्रमात या उपक्रमाचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण करण्याचे प्रस्तावित आहे.
iv) महावाचन उत्सव-२०२४ या उपक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत प्रचार व प्रसार या उद्दिष्टासाठी उपलब्ध असलेल्या निधीपैकी रु.३ कोटी (अक्षरी रुपये तीन कोटी) इतका निधी उपलब्ध करुन द्यावा. सदर खर्चास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समन्वयाने याबाबतची संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची राहील.
७. या उपक्रमासाठी स्टार्स या केंद्रपुरुस्कृत योजनेंतर्गत उपलब्ध निधीतून प्रचार व प्रसार यासाठीचा खर्च वगळता कोणत्या बाबीसाठी किती निधी खर्च करण्यात यावा, हे राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई ठरवतील.
८. सदर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई हे आवश्यकतेनुसार सूचना निर्गमित करतील.
९. सदर शासन निर्णय वित्तीय अधिकार नियमपुस्तिका १९७८, भाग-पहिला, उपविभाग भाग-३, अनुक्रमांक ४ मधील परिच्छेद क्रमांक २७ (२) (ब) अन्वये प्रशासनिक विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
१०. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०७१६१२०३०९९४२२ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

TUSHAR VASANT MAHAJAN
(तुषार महाजन) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन

हे ही वाचाल 👇 

निपुण भारत
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व किडा विभाग 
समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,
मुंबई
जा.क्र. मप्राशिप/सशि/ग्रंथालय/२०२३-२४/362

प्रति,

दि. - 2 FEB 2024
शिक्षणाधिकारी (प्राथ)/ (माध्यमिक),
जिल्हा परिषद,
सर्व जिल्हे.

विषय :- 'महावाचन उत्सव' या उपक्रमाबाबत Google link भरुन पाठविण्याबाबत.



Also read 

राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम राबविणेबाबत.
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०२३/प्र.क्र.३६० / एसडी-४
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक :- २२ नोव्हेंबर, २०२३.
संदर्भ:-
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे पत्र क्र.जा.क्र.मप्राशिप / सशि / ग्रंथालय / २०२३-२४ / २८५९, दिनांक १८.१०.२०२३.
प्रस्तावना :-
व्यक्ती उन्नतीला, समाज विकासाला, राष्ट्र उत्कर्षाला वाचन आवश्यक आहे. वाचन हे एक महत्त्वाचे मूलभूत कौशल्य आहे. वाचन संज्ञानात्मक विकासाला चालना देते. पुढील आयुष्याच्या शैक्षणिक यशाचा अंदाज लावते. बोलली जाणारी भाषा मुले नैसर्गिकरित्या शिकतात, पण वाचन जाणीवपूर्वक शिकले पाहिजे. मुले सामान्यतः इयत्ता २ री पर्यंत वाचायला शिकतात, परंतु National Achievement Survey (NAS )- २०२१ राज्य अहवाल सूचित करतो की, इयत्ता ३ री मधील ३०% पेक्षा जास्त मुले राज्यात लहान मजकूर वाचू शकत नाहीत. इयत्ता ५ वी पर्यंत ४१% मुले त्यांच्या ग्रेड-स्तरासाठी योग्य मजकूर वाचू शकत नाहीत आणि ८ वी पर्यंत ४३% पर्यंत वाचतात. तथापि, लहानपणापासूनच मुलांना कथा पुस्तके (विशेषत: त्यांच्या मातृभाषेत) वाचनाच्या अनेक संधी उपलब्ध करून देऊन हे चित्र बदलू शकते. २०२० पासून, राज्य शासन "गोष्टींचा शनिवार" या वाचन मोहिमेद्वारे
आणि अलीकडेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उर्दू वाचन कार्यक्रमाद्वारे प्राथमिक शाळेतील मुलांमध्ये वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी युनिसेफसोबत काम करत आहे. आनंददायी वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन, युनिसेफ व रिड इंडिया यांच्या संयुक्त भागीदारीत " महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये राबवण्याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचेकडून वरील संदर्भीय पत्रान्वये शासनास प्रस्ताव प्राप्त झाला आहे. सदर प्रस्तावास अनुसरुन राज्यातील सर्व शाळांमध्ये "महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :-
राज्यातील सर्व शाळांमध्ये "महाराष्ट्रातील वाचन चळवळ" हा उपक्रम राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. सदर वाचन चळवळ उपक्रमाचा उद्देश, सहभागी घटक व अंमलबजावणी करणारी यंत्रणा, उपक्रमाची उद्दिष्टे, सदर उपक्रमाची रुपरेषा, सदर उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम आणि आर्थिक तरतूद खालीलप्रमाणे राहील:-
१. वाचन चळवळ उद्देश:-
सन २०२६ पर्यंत महाराष्ट्रातील इयत्ता ३ री पर्यंतचे प्रत्येक मूल समजपूर्वक ओघवते वाचन करु लागेल, इयत्ता ८ वी मधील प्रत्येक मुल "शिकण्यासाठी वाचू शकेल" असे सुनिश्चित करणारी आनंददायी वाचनाची लोक चळवळ निर्माण करण्याचा उद्देश आहे.
२. वाचन चळवळ राबविणारे सहभागी घटक :-
१. शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य २. UNICEF ३. रीड इंडिया ४ प्रथम बुक्स
वरील संस्थाच्या मदतीने सदर उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांची राहील.
३. चळवळीची उद्दिष्टे:-
१. वाचनाचे महत्त्व सांगणे आणि इयत्ता ३ री पर्यंत प्रत्येक मूलाला वाचन कौशल्य प्राप्त करुन घेणे व वाचायला शिकविणे.
२. मुलांना वाचनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लोकसहभागातुन कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन एक लोक चळवळ उभी करणे.
३. वाचनाची आवड मुलांमध्ये रुजविण्यासोबतच वयोगटानुसार मुलांना मराठी भाषेतील दर्जेदार साहित्य उपलब्ध करुन देणे व त्याद्वारे मराठी भाषेचा नवीन वाचक वर्ग तयार करण्यास मदत करणे..
४. वाचनाद्वारे मुलांवर चांगले संस्कार घडवणे.
५. कथा, कविता, कादंबरी, नाटके, ज्यातून रसग्रहण दृष्टी प्राप्त होते. यातून मुलांमध्ये रसास्वाद घेण्याची वृत्ती निर्माण करणे
६. मुलांमध्ये नैतिक मुल्यांची रुजवण करणे.

👇👇👇👇👇

राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सव' हा उपक्रमांतर्गत विषय / थिम राबविणेबाबत.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व संपर्ण शासन निर्णय वाचण्या साठी फक्त या ओळीला स्पर्श करा

दि १६ जानेवारी २०२४ चे परिपत्रक

४. उपक्रमाची रुपरेषा :-
(अ) राज्यस्तरीय वाचन चळवळीचा शुभारंभ:- मा. मुख्यमंत्री, मा. उप मुख्यमंत्री तसेच मा. मंत्री (शालेय शिक्षण) यांचे हस्ते महाराष्ट्रातील वाचन चळवळीचा अधिकृत शुभारंभ होईल. सदर चळवळीच्या शुभारंभाचा दिनांक व ठिकाण राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई हे शासन मान्यतेने निश्चित करतील. शुभारंभाच्या कार्यक्रमात निवडक मुलांचे कथाकथन आणि कथा वाचन, वाचन चळवळीची ओळख करुन देणारा लघु चित्रपट व मान्यवरांचे मार्गदर्शन इ. कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
(ब) जिल्हास्तरीय वाचन चळवळीचा शुभारंभ:- राज्यस्तरीय वाचन चळवळीच्या शुभारंभानंतर शिक्षणाधिकारी
(प्राथमिक) हे राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या मान्यतेने दिनांक ठरवून संबंधित जिल्ह्याचे मा. पालकमंत्री यांचे हस्ते जिल्हयात वाचन चळवळीच्या शुभारंभ करतील. या शुभारंभामध्ये प्रत्येक शाळा नजिकच्या शासकीय ग्रंथालयास जोडण्याच्या उपक्रमाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येईल. यासंदर्भातील सविस्तर सूचना आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र क्र. आशिका/२०२३/विद्यार्थी वाचन साहित्य/ना.उ./१०६/७१, दिनांक३ जानेवारी, २०२३ अन्वये सर्व उप संचालक (शिक्षण) व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
 Maharashtratil Vachan Chalval Upkram GR
(क) वाचन संस्कृतीचा महायज्ञ :- या कार्यक्रमाद्वारे वाचन चळवळीला वाचन संस्कृतीचा महायज्ञ असे रूप दिले
जाईल. यामध्ये प्रत्येक आठवडयात एक विषय / थीम निश्चित करुन त्यावर आधारित पुस्तकांचे शाळांमध्ये वाचन करणे, वक्तृत्व स्पर्धा, लेखन स्पर्धा इ. चे आयोजन करणे. मुलांना यासंदर्भात १ ते २ मिनिटाचे व्हिडीओ करून ते सुयोग्य साईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहीत करणे, त्याबाबतची स्पर्धा व पारितोषिके (पुस्तक स्वरुपात) प्रदान करणे.
(ड) शाळांचा सहभाग :- राज्यातील सर्व शासनमान्य व खाजगी शाळांचा या उपक्रमांमध्ये सहभाग असेल. (खाजगी शाळांना पुस्तकें अनुज्ञेय होणार नाहीत) वर्षभरात ठराविक तारखा निश्चित करुन या तारखांना प्रत्येक शाळेत वाचनाचे खास वर्ग / कार्यक्रम आयोजित केले जातील. यामध्ये विद्यार्थी पुस्तकांची देवाणघेवाण करतील.
(इ) ऑनलाईन प्लॅटफॉर्म (online platform) :- युनिसेफ / रिड इंडिया यांच्या सहकार्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्म
विकसीत करुन त्यावर Video, Audio, Short essay इ. स्वरुपात विद्यार्थ्यांकडुन प्रतिसाद मिळविणे जेणे करुन जास्तीत जास्त मुलांना या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळू शकेल..
(ई) ब्रॅन्ड अॅम्बेसेडर (Brand Ambassador ) नियुक्त करणे :- या उपक्रमास सर्वसामान्य लोकांचा सहभाग
वाढविण्याच्या दृष्टीकोनातून समाजाच्या सर्व क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना राज्यस्तरीय व क्षेत्रीय स्तरावर Brand Ambassador म्हणून राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई हे त्यांच्या स्तरावर नियुक्त करतील.
(उ) मिडिया प्लॅटफॉर्मचा सहभाग:- बहुविध मीडिया प्लॅटफॉर्म आणि विभागांद्वारे जनजागृती निर्माण
करण्यासाठी समाजात वाचनाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलांना प्रिंट व पुस्तकांच्या संपर्कात आणण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (DGIPR) च्या मदतीने मीडियाचा वापर केला जाईल. याबाबत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सामुदायिक रेडिओ स्टेशन, एफएम रेडिओ पॅनेल, प्रिंट / डिजिटल मिडिया आणि टीव्ही, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक जागांवर पोस्टर्स इत्यादींचा वापर करुन मोहिमेचा प्रचार व प्रसार करण्यात येईल.
ऊ) लोकांच्या प्रयत्नांना प्रसिध्दी :- समाजाला पूर्णपणे गुंतवून ठेवण्यासाठी, मुलांना चांगल्या दर्जाची पुस्तके
उपलब्ध करून देण्यासाठी सृजनशील कल्पनांना चालना देणाऱ्या स्पर्धा आयोजित केल्या जातील. लोकांच्या प्रयत्नांना प्रसिद्धी दिली जाईल, ज्या ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या गावातील / शहरातील सर्व मुले इयत्ता ३ री पर्यंत वाचू शकतात असे घोषित करतील व सदर विद्यार्थ्यांना प्रसिध्दी दिली जाईल. तसेच स्पर्धेचे निरोगी वातावरण तयार करून पुरस्कृत केले जाईल. राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्कार देण्यात येतील आणि त्यासाठी स्थानिक नेत्यांना प्रोत्साहन आणि बक्षीस देण्यात येईल.५. या उपक्रमांतर्गत शालेय स्तरावर खालील उपक्रम राबिण्यात येतील:-
वाचनाला चालना देण्यासाठी आणि मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी वाचनाबाबत शाळांसाठी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्या स्तरावर मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात येतील. या
उपक्रमांतर्गत शालेय स्तरावर खालील उपक्रम राबिण्यात येतील:-

👇👇👇👇👇

राज्यातील सर्व शाळांमध्ये 'महावाचन उत्सवहा उपक्रमांतर्गत राबविणेबाबत.अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व संपर्ण शासन निर्णय वाचण्या साठी फक्त या ओळीला स्पर्श करा

दि ०४ डिसेंबर २०२३ चे परिपत्रक

अ) साप्ताहिक दोन वाचन तासिकाः-
शिक्षण विभाग, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक शाळेच्या वेळापत्रकात आठवड्यात २ वाचन तासिका समाविष्ट करण्यात येतील. यापैकी, गोष्टींचा शनिवार उपक्रमाचा एक भाग म्हणून शनिवारी एक तासिका नियोजित केली जाईल आणि दुसरी तासिका SCERT/MPSP द्वारे प्रदान केलेल्या श्रेणीबद्ध गायक/पुस्तकांच्या माध्यमातून भाषेच्या विकासास चालना देण्यात येईल.
ब) गोष्टींचा शनिवार :- गोष्टीचा शनिवार या उपक्रमांतर्गत सर्व शाळांमध्ये दर शनिवारी ई-पुस्तके उपलब्ध करून दिली जातात. ही ई-पुस्तके राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे द्वारे सर्व शालेय भाषांमध्ये उपलब्ध करुन दिली जातील आणि त्यात पुस्तकासोबत प्रोत्साहन देणारे उपक्रम समाविष्ट केले जातील.. क) आनंदाचा तास :-
ड्रॉप एव्हरीथिंग अँड रीड (DEAR) यात विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी वर्गाच्या वेळापत्रकात नियमितपणे बाजूला ठेवलेल्या वेळेचा उपयोग केला जातो. भारतातील काही खाजगी शाळांसह अनेक देशांमध्ये याचा सराव केला जातो. या उपक्रमांतर्गत, शाळेच्या वेळापत्रकात किंवा शाळा सुरू होण्यापूर्वी १५-२० मिनिटे शिक्षक आणि मुलांसाठी कथा पुस्तके वाचण्यासाठी आनंदाचा तास वेळा पत्रकात समाविष्ट केला जाईल. त्यानंतर मुलांना कथेचा सारांश देण्यास, त्यांचे आवडते पात्र चित्रित करण्यास किंवा इतर अशा मजेदार कृती करण्यास सांगितले जाईल.
ड) उपलब्ध अॅप्स आणि डिजिटल संसाधनांच्या वापरास प्रोत्साहन देणे :-
शाळेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये इतर डिजिटल संसाधनांचा समावेश असेल जसे की प्रथम बुक्स स्टोरीव्हीवर पोर्टल आणि गुगल बोलो अॅप, मुलांना विविध भाषांमधील विविध बालसाहित्य सहज उपलब्ध करुन देता येईल. त्याचप्रमाणे समग्र शिक्षा अंतर्गत विविध शाळांना देण्यात आलेले ICT Lab, Tablet, TV sets इ. च्या माध्यमातून ई. साहित्य उपलब्ध करुन दिले जाईल.
इ) रीड इंडिया सेलिब्रेशन उपक्रम :-
 Maharashtratil Vachan Chalval Upkram GR
या उपक्रमांतर्गत, रीड इंडिया सेलिब्रेशनच्या आयोजकांच्या भागीदारीत शाळांना रीड इंडिया सेलिब्रेशन (RIC) उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. रीड इंडिया सेलिब्रेशनचा उद्देश मुलांना स्वतंत्रपणे विचार करण्यास आणि कार्य करण्यास सक्षम होण्यासाठी अवांतर वाचनाची शैक्षणिक पुस्तके वाचण्यास प्रोत्साहित करणे आहे. या उपक्रमांतर्गत, शाळेतील त्यांच्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्वेच्छेने साइन-अप करण्यास सांगितले जाईल, जेथे त्यांना रीड इंडियाच्या या उपक्रमासाठी स्वतंत्र पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांच्या मुख्य संदेशांचा सारांश देणारा २ मिनिटांचा व्हिडिओ देखील अपेक्षित आहे... प्रत्येक जिल्हयात प्रत्येक आठवडयात प्राप्त होणाऱ्या व्हिडिओ (Video) मधून सुयोग्य व्हिडिओची निवड करुन अशा निवडक व्हिडिओ ना पारितोषिके प्रदान केली जातील. (ई) ग्रंथोत्सव व पुस्तकांचे प्रदर्शन:-
शिक्षणाधिकारी हे संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून जिल्हास्तरावर ग्रंथोत्सवाचे आयोजन करतील. तसेच जिल्हास्तरावर पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करतील. सदर पुस्तकांच्या प्रदर्शनास शाळा भेट घेतील याची दक्षता शिक्षणाधिकारी घेतील.
उ) या उपक्रमाकरीता समग्र शिक्षा अंतर्गत Library Grant, Community Mobilization & MMMER मधून सर्व शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांना वयोगटानुसार पुस्तके संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मान्यतेने उपलब्ध करुन देण्यात येतील. याव्यतिरीक्त दहा प्रवर्गातील दहा पुस्तकांची यादी संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे प्रसिध्द करतील. तसेच विद्यार्थी व शिक्षक हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांना पुस्तकांची शिफारस करतील व सदर शिफारसी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या स्तरावर पुस्तकांची निवड करतांना विचारात घेण्यात येतील.. ६. आर्थिक तरतूद:-
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या दिनांक ०७.०६.२०२३ रोजीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीतील ठराव क्रमांक १०८५ नुसार "महाराष्ट्रातील वाचन चळवळ" या उपक्रमाकरिता येणाऱ्या खर्चाबाबत आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. सदर मंजूर तरतूदीतून या उपक्रमाचा खर्च भागविण्यात यावा...
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३११२२१६१२४२८९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
(इ.मु. काझी) सह सचिव, महाराष्ट्र शासन
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon