आज ६ जानेवारी पत्रकार दिन
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर (जानेवारी ६, इ.स. १८१२; पोंभुर्ले, महाराष्ट्र - मे १८, इ.स. १८४६) हे मराठी भाषेतल्या आद्य पत्रकारांपैकी एक पत्रकार होते. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी सुरू केले.
जीवन
जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.
बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता.
जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांचे शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली.
त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता. गणित व ज्योतिष यांतही ते पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. शिवाय त्यांना रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते
पत्रकारिता
मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवले की, केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत.
श्रीपती शेषाद्री नावाच्या एका मुलाला त्यांनी योग्य मार्ग दाखवला; मात्र लवकरच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.
जानेवारी ६, इ.स. १८३२ रोजी दर्पणाचा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे.
मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, इ.स. १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक 'दिग्दर्शन' त्यांनी इ.स. १८४० साली सुरू केले. 'दिग्दर्शन' मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, व्याकरण, गणित तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषयांवर्चे लेखन नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.
समाजकार्य
सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. 'एशियाटिक सोसायटी'च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. १८४५ साली काढली. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते हिंदुस्तानी भाषेचे अध्यापन करत. त्यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये 'नीतिकथा', 'इंग्लंड देशाची बखर', 'इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप', 'हिंदुस्थानचा इतिहास', 'शून्यलब्धिगणित' या ग्रंथांचा समावेश आहे. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत.
उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्ट्युडंट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.
साधारणपणे इ.स. १८३० ते इ.स. १८४६ या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले.
त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत त्यांचे निधन झाले.
सन्मान
‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही करण्यात आले होते (१८४०).
साभार Credit - google Wikipedia
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon