DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Direct Service Posts In PESA Scheduled Sector 17 Cadre On Emolument Basis

Direct Service Posts In PESA Scheduled Sector 17 Cadre On Emolument Basis



अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत


दिनांक - ०५ ऑक्टोबर, २०२४.

प्रस्तावना -
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेच्या पदांबाबत संदर्भाधीन अधिसूचनेनुसार विविध विभागांमार्फत भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सदर भरती प्रक्रियेनुसार अधिसूचित १७ संवर्गातील पदांसाठी देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये पेसा क्षेत्रातील ६९३१ रिक्त पदांचा समावेश होता. सदर जाहिरातीनुसार सुरू झालेल्या भरती प्रक्रिया उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या. काही विभागांनी निवड प्रक्रियेचा अंतिम निकाल जाहिर केला होता, तर काही विभागांमार्फत निवडप्रक्रियेचा निकाल तयार झाला होता, परंतु जाहिर झाला नव्हता.
सदर अधिसूचना मा. सर्वोच्च न्यायालयात आव्हानित झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर आहे त्याच टप्प्यावर थांबविण्याच्या सूचना शासनाच्या आदेशान्वये देण्यात आल्यामुळे ही भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती.
अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गामध्ये तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, कृषी सहायक, शिक्षक, आरोग्य सेवक व बहुउद्देशीय आरोग्य सेवक या संवर्गांचा समावेश असून या संवर्गातील कर्मचारी प्रामुख्याने ग्राम पातळीवर कार्यरत असतात. अशा गावपातळीवरील काम करणाऱ्या या संवर्गातील अंदाजित ६९३१ रिक्त पदांच्या पदभरतीसाठीची भरती प्रक्रिया निवडीच्या अंतिम टप्प्यावर थांबविण्यात आली होती.
निवडीच्या अंतिम टप्प्यापर्यंत येऊन भरती प्रक्रिया थांबल्यामुळे ग्राम पातळीवरील अंदाजित ६९३१ पदे गेल्या वर्षभरापासून रिक्त राहिली आहेत. त्यामुळे अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) गावांमधील आरोग्य, शिक्षण, अंगणवाडी इत्यादी प्राथमिक सुविधा व ग्रामीण विकास यांच्यावर विपरित परिणाम झाला असून आदिवासी बहुल गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शासनास देखील विविध कल्याणकारी योजना गाव पातळीवर पोहोचविण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या निर्माण झालेल्या अपवादात्मक परिस्थितीवर मात करण्यासाठी व आदिवासी बहुल पेसा क्षेत्रातील गावांमध्ये प्राथमिक सुविधा तातडीने पुरविण्यासाठी सदर कर्मचाऱ्यांच्या नेमणूका मानधन तत्वावर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

          शासन निर्णय-

अनुसूचित क्षेत्रात (पेसा) ग्राम पातळीवर काम करणाऱ्या १७ संवर्गातील पद भरतीसाठी जाहिरातीद्वारे निवड प्रक्रिया राबवून निवड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली होती. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून मानधन तत्वावर नेमणूका करून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत.
२. पेसा क्षेत्रातील पदे एक वर्षापासून रिक्त असल्याने सदर पदे तातडीने भरण्यासाठी या करिता झालेल्या निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांची विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नेमणूक करण्यात यावी. त्यानुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) अधिसूचित १७ संवर्गातील पदांकरिता निवड प्रक्रियेद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून विशेष बाब म्हणून मानधन तत्वावर नियुक्त करण्यास संवर्गनिहाय संबंधित प्रशासकीय विभागांना परवानगी देण्यात येत आहे.
३. सदरची परवानगी या एकाच प्रकरणात देण्यात असून भविष्यात पूर्व उदाहरण म्हणून याचा उपयोग करण्यात येणार नाही. मासिक मानधन तत्वावर या उमेदवारांची नियुक्ती करताना त्या पदावर प्रथम नियुक्तीच्या वेळी मिळणाऱ्या एकत्रित पगाराइतक्या मानधनावर उमेदवारांची नियुक्ती पात्र उमेदवारांमधून संबंधित विभागांनी करावी.
४. मानधन तत्वावर नेमणूकीचे आदेश देताना मासिक मानधनाची रक्कम आदेशामध्ये नमूद करावी. सदरची रक्कम ही नियमित वेतन नसून मासिक मानधन आहे, ही बाब स्पष्ट करण्यात येत असून विभागांनी यासंदर्भातील आदेशामध्ये ही बाब नमूद करावी.
५. मानधन तत्वावर दिलेल्या नेमणूका या मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका २२१०९/२०२३ च्या अंतिम निर्णयाच्या आधीन राहून देण्यात येत आहेत, ही बाब आदेशात स्पष्टपणे नमूद करावी.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या 🌐👉 www.maharashtra.gov.in 👈या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२४१००५११०२०३३५०१४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

GR PDF COPY LINK


(र.अं. खडसे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन


महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक: बीसीसी २०२३/प्र.क्र. ५४/आरक्षण ५ मुंबई

संदर्भ-
राज्यपाल महोदयांनी, अनुसूचित क्षेत्रातील अधिसूचित १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याबाबत दि.२९.८.२०१९ रोजी निर्गमित केलेली अधिसूचना.

Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon