Preference To local Candidates Recruitment In DCCBank
Regarding giving preference to local candidates in recruitment in District Central Cooperative Banks.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत.
दिनांक:- ०८ मे, २०२६
संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. जिमस. ०४१८/६९४/प्र.क्र.६९/२-स, दि.१५.०६.२०१८
२. शासन निर्णय क्र. जिमस.०४१८/६९४/प्र.क्र.६९/२-स, दिनांक २३.०६.२०२२
प्रस्तावना:-
राज्यात सध्या ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका कार्यरत आहेत. या बँकांचे मुख्य उद्दिष्ट प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना पतपुरवठा करणे व जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करणे हे आहे. जिल्हा स्तरावर शेतकऱ्यांना शेती / पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याकरीता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची महत्वाची भूमिका आहे. तसेच या बँकांच्या आर्थिक स्थितीवर गाव स्तरावरील विकास संस्थांचे अस्तित्व अवलंबून असते. सहकारांतर्गत सहकार या संकल्पनेनुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या प्राथमिक सहकारी संस्थांच्या मातृसंस्था आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे कार्यक्षेत्र त्या-त्या जिल्ह्यापुरते मर्यादीत आहे. तसेच या बँकांचे सर्व सभासद त्या जिल्ह्यातील असतात. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिल्यास असे कर्मचारी बँकेचे ग्राहक / सभासद / ठेवीदार यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतील. यास्तव राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याबाबत धोरण ठरविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय-
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या अनुषंगाने बँकांनी खालील कार्यपध्दती अवलंबावी-
१. संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी (Domicile Certificate / अधिवास प्रमाणपत्र) असलेल्या उमेदवारांना ७० टक्के जागा राखीव ठेवाव्यात.
२. उर्वरीत ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी खुल्या असतील. तथापि, जिल्ह्याबाहेरील उमेदवार पुरेशा प्रमाणात उपलब्ध न झाल्यास या जागा स्थानिक उमेदवारांमधुन भरता येतील.
२. सदर शासन निर्णय ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी पदभरतीची जाहिरात या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी प्रसिध्द केली आहे त्या बँकांनाही लागू राहील.
३. सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०५०८१४४७५९२००२ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
अपर निबंधक तथा सह सचिव, महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्र. जिमस. ०४२६/प्र.क्र.५०/२-स मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon