Recruitment Process Police Constables GR
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणा-या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत..
महाराष्ट्र शासन
गृह विभाग
शासन निर्णय क्रमांकः पोलीस-११२५/प्र.क.१७३/पोल-५अ, मंत्रालय, मुंबई
दिनांक :- २० ऑगस्ट २०२५
वाचा :-
१) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक-पदनि-२०२२/प्र.क्र.२/२०२२/आ.पु.क., दि.३०.०९.२०२२
२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक-प्रानिमं १२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ, दि.०४.०५.२०२२
३) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक-प्रानिमं १२२२/प्र.क्र.१३६/का.१३-अ, दि.२१.११.२०२२
४) अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक अपोमसं / प्रशिक्षण/पोशि भरती २०२४-२५/२२/२०२५/९५९, दि.०७.०५.२०२५
५) विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक अपोमसं/ प्रशिक्षण/पोशि भरती २०२४-२५/२२/२०२५, दि.२३.०७.२०२५
६) विशेष पोलीस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक अपोमसं / प्रशि/पोशि भरती २०२४-२५/२२/२०२५, दि.१२.०८.२०२५
७) दि.१२.०८.२०२५ रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळ बैठकीचे कार्यवृत्त
प्रस्तावना :-
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीत रिक्त झालेली व दि.०१.०१.२०२५ ते दि.३१.१२.२०२५ या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवावयाच्या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबतचा प्रस्ताव दि.१२.०८.२०२५ रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
शासन निर्णय
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दि.०१.०१.२०२४ ते दि.३१.१२.२०२४ या कालावधीत रिक्त झालेली व दि.०१.०१.२०२५ ते दि.३१.१२.२०२५ या कालावधीत रिक्त होणारी १५.६३१ पदे भरतीकरीता उपलब्ध होणार आहेत. सदर पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे.
पदनाम रिक्त पदांची संख्या
पोलीस शिपाई १२,३९९
पोलीस शिपाई चालक २३४
बॅण्डस्मन २५
सशस्त्र पोलीस शिपाई २,३९३
कारागृह शिपाई ५८०
एकूण १५,६३१
२. वित्त विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता, अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे ५० टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील १०० टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद १५.६३१ रिक्त पदे (१०० टक्के) भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्र. १ येथील दि.३०.०९.२०२२ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदींमधून सूट देण्यात येत आहे.
३. सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०४.०५.२०२२ व दि.२१.११.२०२२ च्या शासन निर्णयातील तरतूदींमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन २०२४-२५ ची भरती प्रक्रिया घटकस्तरावरुन राबविण्यास तसेच OMR आधारीत लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे.
४. सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे.
५. प्रस्तुत भरती प्रकियेसाठीही या पूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.४५०/- व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.३५०/- इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरुपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरीता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
६. प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती, छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवापुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना देण्यात येत आहेत.
७. सदरहू परिक्षा पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना/ आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरीता पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमीत करावे.
८. सदरची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याची व सनियंत्रण करण्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची राहील. परीक्षांसंदर्भात आक्षेप /वाद/न्यायालयीन प्रकरण/विधानमंडळ कामकाजविषयक बाबी उद्भवल्यास, त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्यांच्या अधिनस्त संबंधित घटक/गट प्रमुखांची राहील.
९. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०८२०१६१४५७२९२९ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
शासन निर्णय पीडीएफ लिंक
उप सचिव, महाराष्ट्र शासन
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon