Child Care Leave For Employees GR
राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना बाल संगोपन रजा मंजूर करणेबाबत.
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१७/प्र.क्र.२५/सेवा-६
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : १५ डिसेंबर २०१८
वाचा : शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: संकीर्ण-२०१७/प्र.क्र.२५/सेवा-६, दिनांक २३.०७.२०१८.
प्रस्तावना ::
राज्य शासकीय व अन्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलाच्या संगोपनासाठी बाल संगोपन रजा मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय वरीलप्रमाणे दिनांक २३.०७.२०१८ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्र.१ (XVI) मध्ये नमूद केल्यानुसार, ज्या पुरुष वर्गीय शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणास खिळलेली आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यास त्याच्या मुलाच्या बालसंगोपनाच्या प्रयोजनासाठी बाल संगोपन रजा अनुज्ञेय करण्यासाठी, पत्नीस कोणकोणते आजार असले पाहिजेत, तसेच अशा स्वरुपाचे आजार असल्याबाबत कोणकोणते निकष असावेत, याबाबतचा प्रस्ताव काही काळ, शासनाच्या विचाराधीन होता. सदर प्रकरणी सर्वसाकल्याने विचार करुन, पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय :
ज्या राज्य शासकीय पुरुष कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षक व शिक्षकेतर पुरुष कर्मचारी, मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कृषि व बिगर कृषि विद्यापीठे व त्यांना संलग्न महाविद्यालयातील पूर्णकालिक शिक्षक व शिक्षकेतर पुरुष कर्मचारी यांची पत्नी विविध आजारपणाच्या कारणास्तव जेवढ्या कालावधीसाठी अंथरुणास खिळून राहिली आहे (Bed Ridden), अथवा त्यांची पत्नी मनोरुग्ण असल्यामुळे, जेवढ्या कालावधीसाठी बाल संगोपन करण्यास असमर्थ होत आहे (Incapacitated), तेवढ्या कालावधीचे वैद्यकीय अधीक्षक (जे. जे. रुग्णालय)/जिल्हा शल्य चिकित्सक (शहरी भागासाठी) / जिल्हा आरोग्य अधिकारी (ग्रामीण भागासाठी) यांचेकडून संबंधित शासकीय कर्मचाऱ्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यानंतर, संबंधित शासकीय पुरुष कर्मचाऱ्यास, तेवढ्या कालावधीची बाल संगोपन रजा अनुज्ञेय करण्यास, या शासन निर्णयान्वये मान्यता घेण्यात येते.शासकीय कर्मचाऱ्याची पत्नी किती कालावधीसाठी आंतररुग्ण आहे (In-patient) आणि अंथरुणास खिळलेली आहे अथवा बालसंगोपन करण्यास असमर्थ आहे, हे पाहून प्रकरणपरत्त्वे तेवढ्या कालावधीची (१८० दिवसाच्या कमाल मर्यादेत), बाल संगोपन रजा संबंधित पुरुष शासकीय कर्मचाऱ्यास अनुज्ञेय राहणार आहे. तसेच बाल संगोपनासाठी पतीला रजा मंजूर झाल्यानंतर, रजा कालावधीत पत्नीचा मृत्यु झाल्यास, पतीला उर्वरित कालावधीची बाल संगोपन रजा १८० दिवसांच्या कमाल मर्यादेत अनुज्ञेय राहील.
३. बाल संगोपन रजेबाबत शासन निर्णय, वित्त विभाग, दिनांक २३.०७.२०१८ मधील अटी व शर्ती या शासन निर्णयान्वये बाल संगोपन रजा घेणाऱ्या लाभार्थ्यांना लागू राहतील.
४. हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.
५. या शासन निर्णयाच्या अनुषंगाने महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकाश करण्यात येतील.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा सांकेतांक क्र. २०१८१२१५१५०१४१७२०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अवर सचिव, वित्त विभाग
सोबत विहित प्रपत्र
विशेष बाल संगोपन रजेच्या हिशोबाबाबतचे प्रपत्र
बाल संगोपन रजेचा कालावधी - पासून ते पर्यंत
शिल्लक रजा - शिल्लक दिनांक
सक्षम प्राधिकाऱ्याची स्वाक्षरी व पदनाम, कार्यालय
Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon