Pre Monsoon Inspection Schools
प्राशिंसं २०२६ / इमारत दुरूस्ती/MPSP/
Regarding pre-monsoon inspection of buildings, classrooms, kitchens and toilets of all government and local government schools in the state.
विषय :- राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांच्या इमारती, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहांची मान्सूनपूर्व (Pre-Mansoon) तपासणी करणेबाबत.
संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांक- जिवायो-२०२१/प्र.क्र.४०/एसएम-४. दि.१३ मे, २०२२
२. शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-११२५/प्र.क्र.२५३/एसएम-१, दि.१६ एप्रिल २०२६
३. राज्य प्रकल्प समन्वयक म.प्रा.शि.प., मुंबई. जा.क्र.मप्राशिप/सशि/बांधकाम/२०२६-२७/१५२५ दि.२२/०४/२०२६
राज्य प्रकल्प समन्वयक म.प्रा.शि.प., मुंबई यांच्या दि.२२/०४/२०२६ च्या संदर्भ क्र. ३ च्या पत्राचे अवलोकन व्हावे. तसेच संदर्भ क्र.३ चे पत्र मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांच्या निर्देशनास आणून देण्यात यावे. सदर पत्रात नमुद प्रतिवर्षी नियमितपणे इमारतींची मान्सूनपूर्व (Pre-Mansoon) व मान्सूनोत्तर तपासणी (PostMansoon) करणे ही अनिवार्य सुरक्षा प्रक्रिया आहे. सदर मान्सूनपूर्व (Pre-Mansoon) तपासणी दर वर्षी दि. १५ मे पूर्वी करणे आवश्यक आहे. त्या अनुषगांने राज्यातील सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांच्या इमारती, वर्ग खोल्पा, स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहांची मान्सूनपूर्व (Pre-Mansoon) तपासणी दि. १५ मे पूर्वी करणे आवश्यक आहे. सदर तपासणीमध्ये संरचनात्मक तपासणी, जलरोधक आणि धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारती ओळखणे यांचा समावेश असतो. सदर संरचनात्मक तपासणी, जलरोधक तपासणी व धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतींची निश्चिती केल्यानंतर त्याबाबतचा तपासणी अहवाल तयार करुन त्यानुसार करावयाच्या आवश्यक त्या उपाययोजनांना अंतिम स्वरुप देवून दुरुस्ती कामे संदर्भ क्र. १ व २ च्या शासन निर्णयात / परिपत्रकात नमूद योजनांपैकी उचित योजनांतर्गत मंजूरी व आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर त्यानुसार आवश्यक त्या उपाययोजनांची कामे हाती घेवून ती कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संदर्भ क्र.३ च्या पत्रात नमूद कार्यवाहीच्या अनुषंगाने पूर्व तयारी म्हणून करावयाच्या राज्यातील सर्वशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांच्या इमारती, वर्ग खोल्या, स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहांची मान्सूनपूर्व (Pre-Mansoon) तपासणीच्या संदर्भात खालीत मुद्यांवर कार्यवाही करणे अभिप्रेत आहे.१. संरचनात्मक तपासणी करताना इमारती वा इतर बांधकामांमध्ये संरचनात्मक भेगा आणि कमकुवतपणा ओळखणे.२. संरचनात्मक तपासणी केल्यानंतर धोकादायक असलेली इमारत, वर्ग खोल्या व स्वच्छतागृहे यांची निश्चिती करुन तेथील वापर त्वरीत थांबविणे. ३. संरचनात्मक तपासणी केल्यानंतर वापरास असुरक्षित ठरलेल्या धोकादायक बांधकामांबाबत, शाळांच्या इमारती, वर्ग खोल्या, स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहांबाबत तात्काळ सूचना देवून त्या त्वरीत रिकाम्या कराव्यात.
४. तेथील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करुन त्या ठिकाणी त्यांचे स्थलांतरण करणे.
५. संरचनात्मक तपासणी अंती शाळांच्या इमारती, वर्ग खोल्या व स्वच्छतागृहांच्या छतामधून होणारी गळती थांबवण्याकरीता जलरोधक प्रकियेची कामे हाती घेवून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे.
६. शाळांच्या इमारती, वर्ग खोल्या, स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहांच्या संदर्भात करावयाची महत्वाची व तातडीची संरचनात्मक दुरुस्तीची कामे हाती घेवून ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे.
७. विहीत कार्यपध्दतीचा अवलंब करुन धोकादायक संरचना लवकरात लवकर पाडणे.
८. जिल्हा परिषदेच्या अधिनस्त मोडकळीस आलेल्या / धोकादायक झालेल्या शाळांच्या इमारतींच्या निर्लेखनासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या दिनांक २६/१२/२०२५ च्या शासन परिपत्रकातील तरतूदींचा आधार घेवून कार्यवाही करणे.
९. शाळेतील इमारती, वर्ग खोल्या, स्वयंपाकगृह व स्वच्छतागृहे यांना भेगा पडल्या असल्यास त्यांची उचित दुरुस्ती त्वरीत करण्यात यावी.
१०. धोकादायक इमारती / वर्ग खोल्पांचा वापर तात्काळ वापर बंद करुन धोकादायक इमारतीच्या सभोवताली प्रवेशास मज्जाव करणारे काटेरी कुंपण घालण्यात यावे. तसेच सदर इमारतीकडे जाण्यास मनाई करावी.
११. शाळा परिसरामध्ये विहीर असल्यास विहीरीस सुरक्षिततेच्या अनुषंगाने लोखंडाची मजबूत जाळी बसविण्यात यावी. तसेच सदर ठिकाणी विद्यार्थ्यांनी जाऊ नये याकरिता त्या ठिकाणी उचित असे सूचना फलक लावण्यात यावेत.
१२. शाळेतील सांडपाण्याचा निचरा इमारतीच्या विरुध्द दिशेने होईल याबाबत काळजी घेण्यात यावी.
१३. पर्जन्यवाहक नलिका व गटारे यांची साफ-सफाई करणे.
१४. पर्जन्यवाहक नलिकांची तपासणी करुन त्या ठिकाणी अडकलेला कचरा असल्यास तो काढून टाकणे व सदर नलिका पाणी वाहून नेण्यासाठी अडथळा रहीत असतील याची खातरजमा करुन घेणे.
१५. तसेच पावसाळी पाणी वाहून नेणारी गटारे (Strom Water Drain) अडथळारहीत (removing chock-up if any) राहतील याप्रमाणे साफ-सफाई करणे.
१६. पर्जन्य वाहक नलिकांना जोडणारी इमारतीच्या छतावरील छिद्रे (Openings) मोकळी (removing chock-up if any) करणे, पावसाचे पाणी वाहून नेणारे Spouts साफ करणे.
१७. इमारतीच्या भिंतीवर वा इतरत्र वाढलेली लहान मोठी झाडी-झुडपे, वनस्पती व गवत काढून टाकणे.
१८. शाळेतील सर्व वर्गखोल्यांतील विद्युत जोडणी सुस्थितीत असल्याची तपासणी करण्यात यावी.
१९. विद्युत तार / वायर / केबल लोंबकळत असतील तर त्या सुरक्षितपणे व व्यवस्थितरीत्या अडकविण्यात याव्यात. तसेच सदर विद्युत तार / वायर / केबल मधून विद्युत प्रवाह सुरु असल्यास त्यासंदर्भात योग्य ती खबरदारी घेऊन त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.
२०. विद्युत अर्थिंगची जोडणी योग्य प्रकारे केल्याबाबतची खातरजमा करण्यात यावी.
२१. विद्युत स्विचेस, संकिट व फ्युज यांची तपासणी वेळोवेळी करण्यात यावी व सदर बाबी योग्य प्रकारे /सुरक्षितरीत्या कार्यरत असल्याची खातरजमा करण्यात यावी. २२. विद्यार्थ्यांना विद्युत प्रवाहाचा झटका (Electric shock) लागू नये या करीता विद्यार्थ्यांनी विद्युत खांबास स्पर्श करु नये अशा स्पष्ट सूचना देण्यात याव्यात.
२३. विद्युत तार / वायर / केबल च्या जवळ झाडाच्या फांद्या असल्यास त्याची नियमित व सुरक्षितपणे छाटणी करण्यात यावी. सदर छाटणी करण्यापूर्वी संबधीत प्राधिकरणाची या संदर्भातील पूर्व परवानगी घेण्यात यावी.
२४. प्रमुख विद्युत वितरण व्यवस्था कुलूप बंद ठेवावी.
२५, जिने, व्हरांडे व आपत्कालीन मार्गिका या पूर्णपणे अडथळा विरहीत मोकळ्या राहतील व त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सामान / साहित्य वा इतर अडथळा निर्माणकरणा-या वस्तू ठेवण्यात येऊ नयेत याबाबत दक्षता घेण्यात यावी.
२६. शालेय इमारतीच्या परिसरात खड्डे असल्यास सदर खड्डे बुजविण्याबाबत उचित कार्यवाही त्वरीत करण्यात यावी.
२७. शाळांच्या मुख्य प्रवेशद्वार व कुंपण भिंत यांची पाहणी करुन मुख्य प्रवेशद्वार व कुंपण भिंत सुस्थितीत असल्याबाबत खातरजमा करण्यात यावी. आवश्यकता वाटल्यास उचित दुरुस्ती करण्यात यावी.
उपरोक्त नमूद मुद्यांच्या अनुषंगाने मान्सूनपूर्व (Pre-Mansoon) तपासणी करुन त्या अनुषंगाने करावयाची दुरुस्तीची कामे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या निर्देशनास आणून द्यावीत. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संमतीने कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन घेऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत.
Digitally signed by SHARAD SHANKARGIRI GOSAVI Date: 19-05-2026 16:59:09
परिपत्रक पीडीएफ लिंक
(शरद गोसावी) शिक्षण संचालक (प्राथमिक)
प्रतः माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी सादर, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व जिल्हे.
प्रतः माहितीस्तवश्री. गोविंद कांबळे, राज्य प्रकल्प समन्वयक, म.प्रा.शि.प.मुंबई.

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon