DNYANYATRITANTRASNEHI
PURE EDUCATION NOTHING ELSE Visit our website.

Organizing Monthly Education Conferences राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषद आयोजित करणेबाबत

Organizing Monthly Education Conferences



Rajyatil Sarv Samuh Sadhan Kendra Staravar Darmha Shikshan Parishad Aayojit Karanebabat

Regarding organizing monthly education conferences at all group resource centers in the state

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

जा. क्र. राशैसंप्रप/साव्यावि/शि.प./

प्रति,

१) प्राचार्य, प्रादेशिक विद्या प्राधिकरण (सर्व)

२) प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (सर्व)

३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) (सर्व)

४) शिक्षण निरीक्षक, प्रशासन अधिकारी, म.न.पा. (सर्व)


विषय : राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषद आयोजित करणेबाबत


संदर्भ : १) शासन परिपत्रक क्र. संकीर्ण ३२१६/ (९४/२०१६)/ प्रशिक्षण, दि. १ सप्टेंबर २०१६

२) शासन निर्णय क्र. डायट ४५१६/ (४०/१६)/ प्रशिक्षण दि. १७ ऑक्टोबर २०१६

३) शासन परिपत्रक क्र. राप्रधो-२०२६/प्र.क्र.११/प्रशिक्षण, दि. ६ मे २०२६

उपरोक्त संदर्भान्वये राज्यातील सर्व समूह साधन केंद्र स्तरावर दरमहा शिक्षण परिषदा आयोजित करण्यात येतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये केंद्रातील शिक्षक राबवत असलेले विविध उपक्रम, अध्ययन अनुभव समजून घेणे, अनुभवांचे आदानप्रदान करणे, एकत्र येऊन शिक्षकांना जाणवणाऱ्या समस्या चर्चेद्वारे सोडवणे, क्षमता आधारित वर्ग-नियोजन करणे, केंद्र संसाधन गटाचे मार्गदर्शन यातून शिक्षकांची क्षमता बांधणी होते.

प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या व्यावसायिक विकासास चालना देणे तसेच वर्ग अध्यापन अधिक परिणामकारक व गुणवत्तापूर्ण करण्यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांद्वारे निपुण भारत अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN), क्षमता आधारित शिक्षण, बहुवर्ग अध्यापन कौशल्ये आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा सातत्यपूर्ण आढावा, मुलांच्या शिकण्यामध्ये पालकांचा सक्रीय सहभाग या बाबींवर विशेष भर देण्यात यावा. संदर्भ क्र. १ अन्वये समूह साधन केंद्रस्तरावर दरमहा शिक्षण परिषदेचे आयोजन करणे अनिवार्य आहे. तसेच संदर्भ क्र. ३ अन्वये परिषदेमध्ये शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहील. तसेच, त्यांची विद्या समीक्षा केंद्र पोर्टल / App वर समूह साधन केंद्र समन्वयक यांचे द्वारे उपस्थिती नोंदविली जाईल. शिक्षण परिषदेत ठरलेल्या गोष्टींची प्रत्यक्ष वर्गातील अंमलबजावणी बाबत समूह साधन केंद्र समन्वयकांनी शाळाभेटी दरम्यान पडताळणी करावी.

वर्षातील दरमहाच्या शिक्षण परिषदेतील एकूण ४० (१० शिक्षण परिषद x ४ तास) तासिकांना उपस्थितीसाठी जास्तीत जास्त १० घड्याळी तासिका ५० तासांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करण्यासाठी गृहीत धरल्या जातील. त्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांचे आयोजन पुढील पाच सत्रांमध्ये करण्यात यावे. या आराखड्यानुसार संदर्भ क्र. २ अन्वये केंद्र संसाधन गटाने (CRG) स्थानिक शैक्षणिक गरजा व प्राधान्यांचा विचार करून केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांचे आयोजन करावे.

शिक्षण परिषद सत्र नियोजनः केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेत सत्र आयोजन करताना पुढील बाबींचा समावेश करावा.



सत्राचे नाव वेळ सत्रात काय करावे

सत्र पहिले -मागील महिन्याचा आढावा - ४५ मिनिटे - मागील महिन्यात आपल्या वर्गात काय झाले, कोणत्या अडचणी आल्या, कोणत्या लक्षणीय बाबी आढळल्या याचे पुनरावलोकन करावे.

सत्र दुसरे- विचारांची/अनुभवांची देवाण-घेवाण - ४५ मिनिटे - आधीच्या सत्रातील चर्चेवरून शिक्षकांनी वर्गात येणाऱ्या समस्यांवर एकत्रितपणे उपाय शोधावे आणि आपल्या वर्गातील अनुभवांची एकमेकांसोबत देवाण घेवाण करावी.

सत्र तिसरे -पाठांचे मासिक नियोजन आशयाच्या आधारे - १ तास मिनिटे ३० - पुढील महिन्यासाठी वर्गाचे नियोजन करावे, त्यासाठी अध्ययन निष्पत्ती निवडून त्यातून कोणता आशय पोचवायचा आहे हे स्पष्ट मांडावे, त्याला अनुसरून वर्गात गटातील काम कसे असेल, कोणते शैक्षणिक साहित्य कधी वापरता येईल याचे तपशीलवार नियोजन करावे.

सत्र चौथे -- ३० मिनिटे - शाळा व्यवस्थापन समिती, शैक्षणिक ग्रामसभा आणि पालकसभा बैठकांचे आयोजन इ. घटकांचा मुलांच्या शिकण्यात सहभाग कसा मिळवता येईल यादृष्टीने नियोजन करावे.

पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि समुदाय सहभाग

सत्र पाचवे - राज्याचे धोरणात्मक किंवा स्थानिक विषय - ३० मिनिटे - स्थानिक/ जिल्ह्याकडून आलेली महत्त्वाची माहिती आणि धोरणे शिक्षकांपर्यंत पोहोचवावी.

एकूण ४ तास


केंद्र स्तरीय शिक्षण परिषद माहेवार विषय नियोजन-

अ.क्र. महिना विषय

१ जून २०२६ - शाळा प्रवेश, शाळापूर्व तयारी, पालक सहभाग आणि वर्गरचना सद्यस्थिती आढावा, विद्यार्थी उपस्थिती, पालक शिक्षक संघाची स्थापना, पायाभूत चाचणी पूर्वतयारी, सेतू अभ्यास प्रभावी अंमलबजावणी, जीवन शिक्षण मासिक उपयुक्तता, आरोग्य व स्वच्छतेच्या सवयी

२ - जुलै २०२६ - एकवर्ग व बहुवर्ग अध्यापन पद्धती, सेतू अभ्यास आढावा व शैक्षणिक साहित्य व्यवस्थापन, पायाभूत चाचणी आढावा, शाळा व्यवस्थापन समिती बैठक नियोजन, SCERT च्या maa.ac.in या वेबसाईटवरील साहित्याची ओळख, हाताळणी व उपयुक्तता, NEP-२०२० नवीन प्रशिक्षण कार्यवाही आढावा, गुणवत्ता आधारित स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी सहभाग - १००% निकाल उद्दिष्ट, PGI विश्लेषण स्थिती, पालकसभा आयोजन - नियोजन

३ ऑगस्ट २०२६ - निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र, वर्ग व शाळानिहाय पायाभूत चाचणी विश्लेषण, क्षमता-आधारित शिक्षण, मुलांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने केंद्रात मुलींचे शिक्षण व उपस्थिती, गुणवत्तेसाठीचे प्रयत्न, प्रश्नसंच निर्मिती, शैक्षणिक ग्रामसभा/पालकसभा नियोजन, स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांचा आढावा

४ सप्टेंबर २०२६ शिक्षक-विद्यार्थी क्षेत्रभेट नियोजन आणि त्रैमासिक पालकसभा माहितीचा आढावा, समग्र प्रगतिपत्रक (HPC) आढावा, SQAAF आढावा, मासिक पाळी व्यवस्थापन, पालक सभांचे आयोजन व नियोजन

५ ऑक्टोबर २०२६ प्रथम सत्र विद्यार्थी संचयिका नोंदी आढावा आणि क्षमता-आधारित विकास नियोजन, शाळा व्यवस्थापन समिती बैठक आढावा

६ नोव्हेंबर २०२६ - संकलित मूल्यमापन-१ विश्लेषण आणि सुट्टीतील पालक सहभागीय गृहपाठासाठी विद्यार्थी उपक्रमांचे नियोजन, प्रश्नसंच निर्मिती

७ डिसेंबर २०२६ -विद्यार्थ्यांसाठी क्षमता-आधारित शैक्षणिक प्रकल्प नियोजन, शाळा विकास आराखडा नियोजन व कार्यवाही, कला व कार्यानुभव विषयांच्या अनुषंगाने उपक्रमांचे सादरीकरण

८ जानेवारी २०२७ - प्रकल्प-आधारित शैक्षणिक प्रगतीचा आढावा व पुढील नियोजन, राष्ट्रीय विज्ञान दिन- उपक्रम निवड, खेळाचे महत्त्व, पालकसभा आयोजन नियोजन, प्रश्नसंच निर्मिती

९ फेब्रुवारी २०२७ - द्वितीय सत्र विद्यार्थी संचयिका नोंदी आढावा आणि क्षमता-आधारित विकास नियोजन, स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमांचा आढावा

१० मार्च २०२७ - विद्यार्थीनिहाय क्षमता-आधारित उपचारात्मक (Remedial) उपक्रमांचे नियोजन, पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन यावर चर्चा व दिशा ठरविणे, समग्र प्रगतिपत्रक (HPC) आढावा, SQAAF आढावा

शिक्षण परिषदेसाठी उपरोक्त विषय मार्गदर्शक असून केंद्र स्तरीय शिक्षण परिषद संरचनात्मक, गुणवत्तापूर्ण व अधिकाधिक फलदायी होण्यासाठी दिलेले आहेत. यांव्यतिरिक्त स्थानिक गरजेनुसार व शैक्षणिक प्राधान्यानुसार संबंधित केंद्रस्तरावर आवश्यक पूरक विषयांचाही समावेश करावा. शिक्षण परिषदांमध्ये विषयानुरूप चर्चा, अध्ययन अध्यापनातील अडचणी सोडविणेसाठी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण, उत्कृष्ट शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण तसेच वर्गनिहाय व विषयनिहाय मासिक वर्गनियोजन करण्यात यावे.

शिक्षण परिषदेसाठीचे आयोजन व नियोजन करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची राहील. तसेच विषयांचे तज्ञत्व व मार्गदर्शनाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेची राहील. सदर नियोजनानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये केंद्रस्तरावरील शिक्षण परिषदांचे प्रभावी नियोजन व संदर्भीय शासन परिपत्रकातील निर्देशानुसार आयोजन करण्यात यावे. शिक्षण परिषदेची सुधारित मार्गदर्शिका विकसित केली असून कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

परिपत्रक पीडीएफ लिंक 

Digitally signed by

HEMANT VASEKAR

Date: 15-07-2026

12:40:28 (डॉ. हेमंत वर्सेकर भा.प्र.से.)

सचालक,

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

प्रत माहितीस्तव सविनय सादर :-

१) मा. प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२

२) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, शिक्षण आयुक्तालय, मध्यवर्ती इमारत, पुणे- १



Newest
Previous
Next Post »

Please do not enter any spam link in the comment box. ConversionConversion EmoticonEmoticon